Tree Fall Incident : महामार्गावर कोसळलं महाकाय झाड! रुग्णवाहिकांसह शेकडो वाहने वाहतूक कोंडीत अडकली
Tree Fall Incident : शिरूर शहरालगत पुणे-नगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत; नगरपरिषद कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने झाड हटवले.

Tree Fall Incident – शिरूर शहरालगत पुणे-नगर राष्ट्रीय महामार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंपासमोर गुरुवारी मोठे झाड रस्त्यावर कोसळल्याने महामार्गावरील वाहतूक तब्बल तीन तास ठप्प झाली. या घटनेमुळे दोन्ही बाजूंना सुमारे दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ऐन गर्दीच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
वादळी वारा आणि पावसामुळे महामार्गालगतचे मोठे झाड उन्मळून पडून रस्त्याच्या मध्यभागी आले. झाडाचा आकार मोठा असल्याने पुणे व नगर या दोन्ही दिशेची वाहतूक पूर्णपणे बंद पडली. परिणामी ट्रक, बस, चारचाकी आणि दुचाकी वाहनांची मोठी गर्दी झाली. घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलीस, नगरपरिषदेचे कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
यंत्रसामग्रीच्या सहाय्याने झाडाच्या फांद्या व खोड कापून हटविण्याचे काम हाती घेण्यात आले. सुमारे तीन तासांच्या प्रयत्नांनंतर झाड बाजूला करून वाहतुकीसाठी मार्ग खुला करण्यात आला. वाहतूक कोंडीमुळे अनेक नागरिकांना वेळेवर गंतव्यस्थानी पोहोचता आले नाही. काही रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक सेवांची वाहनेही कोंडीत अडकल्याने गैरसोय झाली.
पोलिसांनी वाहतूक नियंत्रणासाठी विशेष प्रयत्न करत वाहनचालकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले. झाड हटवल्यानंतर टप्प्याटप्प्याने वाहने सोडण्यात आली आणि वाहतूक हळूहळू सुरळीत झाली. दरम्यान, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महामार्गालगत धोकादायक अवस्थेतील वृक्षांची पाहणी करून आवश्यक छाटणी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.





