Sinhagad Road Traffic: सव्वाशे कोटींचा फुकटचा मनस्ताप! सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलानंतरही कोंडी काही सुटेना
Sinhagad Road Traffic: धायरी, नऱ्हे, नांदेड सिटीच्या पुणेकरांचे हाल; वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिका अन् पोलिसांची तातडीची बैठक होणार.

Sinhagad Road Traffic – सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेने तब्बल १२० कोटी रूपये खर्चून उड्डाणपूल उभारला तरी वाहतूक कोंडी सुटलेली नाही. पोलिसांचे ढिसाळ नियोजन, रस्त्यावरील खड्डे, अतिक्रमणे, अनधिकृत पार्किंगमुळे वीर बाजी पासलकर चौक ते राजारामपुलापर्यंतच्या दोन किलोमीटरच्या अंतरासाठी पुणेकरांना एक ते दीड तास वाहतूक कोंडीशी झुंजावे लागते.
एकूणच, सव्वाशे कोटी खर्चानंतरही सिंहगड रस्ता परिसरातील नागरिकांचा मनस्ताप काही संपलेला नाही. धक्कादायक बाब म्हणजे ही वाहतूक कोंडी होताना ती सोडविण्याची पोलिसांना गरज वाटत नाही. दुसरीकडे उड्डाणपूलाच्या श्रेयासाठी धडपडणारे लोक प्रतिनिधी याबाबत कमालीचे उदासिन आहेत. यामुळे विद्यार्थी, नोकरदार, रूग्णवाहिका, तसेच दैनंदिन कामासाठी पुण्यात येणारे सामान्य नागरिकांना १२० कोटींचा विकतचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
पूल झाला, पोलीस गायब
धायरी, नऱ्हे, किरकटवाडी, कोल्हेवाडी, नांदेड सिटी या भागात गेल्या दहा वर्षात मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले वाढले आहे. यामुळे येथील नागरीकांना शहरात ये-जा करण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे. त्याला कोणताही पर्यायी रस्ता नाही.उड्डाणपुलापूर्वी येथे सतत वाहतूक कोंडी होत होती. त्यावेळी या रस्त्यावर ताशी अवघा ९ किलोमीटरचा सरासरी वेग होता.
त्यामुळे पालिकेने राजारामपूल ते फनटाईमपर्यंत दुहेरी दोन उड्डाणपूल उभारले. पुलाचे काम झाल्यानंतर चार सिग्नल कमी झाले. त्यामुळे वाहनांचा ३० ते ३५ मिनिटांचा वेळ अवघ्या ४ मिनिटांवर आला. पुलानंतर वाहतूक नियोजनासाठीच्या पोलिसांची संख्या कमी केली. दुसरीकडे राजारामपूल चौकात बाॅटलनेक स्थिती झाली आहे.

राजाराम पुलावरील समोरील बेट काढल्यामुळे रस्ता मोठा झाला आहे. यामुळे वाहनचालक एकमेकांना पाठीमागे टाकत पुढे जाण्याच्या स्पर्धेत वाहतूक कोंडी होण्यास भर पडते.
सकाळी येथून शहरात येणारी ८० टक्के वाहने कर्वे नगरकडे वळतात. २० टक्केच स्वारगेटकडे जातात. त्याच वेळी कर्वेनगरच्या बाजूला राजाराम पूल संपल्यानंतर ही वाहने ज्या रस्त्याने जातात, तेथे १०० मीटर मध्ये तीन वेगवेगळया दिशेने वाहने येतात परिणामी मातोश्री वृध्दाश्रमाच्या दारातील कोंडी थेट सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटीपर्यंत पोहचते. सोमवारीही सकाळी या रस्त्यावर सकाळी ८ ते दुपारी बारापर्यंत तब्बल ४ तास वाहतूक कोंडी होती.
खड्डे, अतिक्रमणे, जड वाहतूक
उड्डाणपूल झाला तरी पुलाखालील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. पुलावर वाहतूक कोंडी झाल्यानंतर वाहनचालक खाली रस्त्यावर येतात. या रस्त्यावर माणिकबाग चौक, हिंगणे चौक, प्रकाश इमानदार चौकात मोठ्या प्रमाणावर रस्त्यावरच वाहने पार्क केलेली असतात.
तसेच रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहने संथ गतीने जातात. रस्त्यावर वर्दळीच्या वेळी जड वाहतुकीला बंदी असली तरी रेडीमिक्स ट्रक, हायवा, राडारोडा घेवून जाणारे मोठे ट्रक राजरोसपणे रस्त्यावरून ये-जा करतात. त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने पुलावर आणि खालीही कोंडी होते
“गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यावर सतत वाहतूक कोंडी होत असून नागरिकांच्याही मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. याबाबत पुढील दोन दिवसात वाहतूक पोलीस आणि पालिकेच्या वाहतूक नियोजन विभागाची एकत्रित बैठक घेतली जाणार आहे.”
– मंजूषा नागपुरे, महापौर, पुणे महापालिका.
“पावसामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येने चारचाकी वाहने काढतात. त्यातच, रस्त्यांवर असंख्य खड्डे असल्याने नागरीक रस्ता मिळेल तेथे वाहने दामटतात. त्यामुळे कोंडी होते. ती सोडविण्यासाठी लवकरच उपाय योजना करणार आहे.
– राहूल गौड, वाहतूक पोलीस निरीक्षक





