Chakan News: चाकणकरांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा; वाचा नगरपरिषदेचा ‘हा’ धडाकेबाज अॅक्शन प्लॅन
Chakan News: जुना पुणे-नाशिक महामार्ग आणि शिक्रापूर रोडवरील अनधिकृत हातगाड्या, शेड आणि दुकानांवर नगरपरिषदेची धडक कारवाई.

Chakan News – चाकण शहरातील वाढती वाहतूक कोंडी, बेशिस्त पार्किंग आणि रस्त्यांवरील अतिक्रमणाचा प्रश्न सोडवण्यासाठी चाकण नगरपरिषदेने महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या (एमएसएफ) प्रशिक्षित जवानांची नियुक्ती केली आहे. जवानांनी रुजू होताच पहिल्याच दिवशी शहरातील प्रमुख रस्ते आणि चौकांमध्ये धडक अतिक्रमणविरोधी कारवाई करत वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटविली.
या कारवाईमुळे शहरातील वाहतूक सुरळीत झाली असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून चाकण शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठ आणि चौकांमध्ये अनधिकृत हातगाड्या, तात्पुरती दुकाने, शेड तसेच इतर अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली होती. त्यामुळे नागरिक आणि वाहनचालकांना दररोज मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता.
या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेने अतिक्रमणविरोधी कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांची मदत घेण्याचा निर्णय घेतला. एमएसएफचे जवान आणि नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागाने संयुक्तपणे जुना पुणे-नाशिक महामार्ग, तळेगाव चौक ते माणिक चौक, शिक्रापूर रोड तसेच मुख्य बाजारपेठ परिसरात विशेष मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान रस्त्यावर अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या हातगाड्या, दुकाने, शेड तसेच वाहतुकीस अडथळा ठरणारे अन्य अनधिकृत साहित्य हटविण्यात आले.
त्यामुळे प्रमुख मार्ग मोकळे होऊन वाहतुकीला मोठा दिलासा मिळाला. महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या तैनातीमुळे नगरपरिषदेच्या अतिक्रमणविरोधी मोहिमेला बळ मिळाले असून नगरपरिषदेच्या मालमत्तेचे संरक्षण, विविध धडक मोहिमांची प्रभावी अंमलबजावणी, कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच प्रशासनाच्या कामकाजात शिस्त निर्माण करण्यासाठी या जवानांची महत्त्वपूर्ण भूमिका राहणार आहे.
नगरपरिषद प्रशासनाने यापुढेही अतिक्रमण करणार्यांविरुद्ध नियमित आणि कठोर कारवाई सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे. व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिकांनी सार्वजनिक रस्त्यांवर अतिक्रमण न करता शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी तसेच शहराच्या शिस्तबद्ध विकासासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
“चाकण शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणाचा प्रश्न सोडवण्यासाठी नगरपरिषदेने कठोर पावले उचलली आहेत. महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान तैनात झाल्यामुळे प्रशासनाला मोठे बळ मिळाले आहे. पहिल्याच दिवशी मुख्य रस्ते आणि चौकांमधील अतिक्रमणे हटवून वाहतूक सुरळीत करण्यात यश आले आहे. यापुढेही शहरात अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही आणि ही धडक कारवाई सातत्याने सुरू राहील.”
– डॉ. अंकुश जाधव, मुख्याधिकारी, चाकण नगरपरिषद






