पुणे – पुणे शहर वाहतूक शाखेने जड बांधकाम संबंधित वाहनांच्या (डंपर, हायवा, मिक्सर इ.) शहरातील प्रवेशाबाबत नव्या आदेशांची अंमलबजावणी केली आहे. हे आदेश वाहतूक कोंडी, नागरी त्रास आणि अपघाताचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने देण्यात आले आहेत. पोलिस उप-आयुक्त (वाहतूक) हिंमत जाधव यांनी हे तात्पुरते आदेश निर्गमित केले. हे आदेश शनिवारी, रविवारी आणि स्वातंत्र्यदिन (१५ ऑगस्ट) सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी लागू राहतील. वाहतूक परवानगीचा कालावधी : शनिवार (०२, ०९, १६, २३ ऑगस्ट) , रविवार (०३, १०, १७, २४ ऑगस्ट)आणि १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ ते १० वाजेपर्यंत शहरात प्रवेश बंद राहिल , उर्वरित वेळात रेड झोनसह प्रवेशास परवानगी राहिल ‘रेड झोन’ म्हणजे कोणते भाग? या आदेशात पुणे शहरातील प्रमुख आणि मध्यवर्ती रस्त्यांना ‘रेड झोन’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. या भागांमध्ये जड वाहनांना प्रवेश बंद करण्यात येईल. त्यामध्ये विमाननगर, कोरेगाव पार्क, औंध, सिंहगड रोड, सातारा रोड, मार्केट यार्ड, लष्कर चौक, मगरपट्टा, मुंढवा, एनआयबीएम रोड, कोंढवा यांसारख्या एकूण ३१ स्थानांचा समावेश आहे. सूचना व अटी : स्लो मुव्हिंग वाहने (जेसीबी , रोड रोलर, ट्रॅक्टर इ.) आणि इतर मालवाहू वाहनांना या आदेशातून वगळण्यात आले आहे. सोमवार ते शुक्रवार या दरम्यान, ज्या वाहनांना आधीच वाहतूक शाखेकडून परवानगी देण्यात आलेली आहे, त्यांना पिक अवर्स वगळून रेड झोनमध्ये प्रवेशाची परवानगी राहील.