Pune Traffic Alert: प्रवाशांनो लक्ष द्या! पालखी सोहळ्यानिमित्त ४ ते ८ जुलै वाहतुकीत मोठे बदल; ‘हे’ मार्ग राहणार बंद
Pune Traffic Alert: संत ज्ञानेश्वर महाराज पालखी निमित्त ४ ते ८ जुलै, तर संत तुकाराम महाराज पालखी निमित्त ५ ते ८ जुलै दरम्यान पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली.

Pune Traffic Alert – संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी निमित्त ४ ते ८ जुलै तर तुकाराम महाराज पालखी निमित्त ५ ते ८ जुलै या कालावधीत पालखी मार्गावरील वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आली आहे. आळंदी आणि देहू येथे भाविकांच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी दिली.
संत तुकाराम महाराजांची पालखी ७ जुलै रोजी देहूगाव येथून प्रस्थान करणार आहे. पालखीचा पहिला मुक्काम देहूतील इनामदारसाहेब वाडा येथे तर दुसरा ८ जुलै रोजी मुक्काम आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात होणार आहे. ही पालखी देहूगाव, अनगडशहा बाबा दर्गा, चिंचोली पादुका, विठ्ठल मंदिर आकुर्डी, खंडोबा माळ, महावीर चौक, पिंपरी चौक, वल्लभनगर, नाशिक फाटा, फुगेवाडी, दापोडी हॅरिस ब्रिज मार्गे पुण्याकडे प्रस्थान करणार आहे.
जुना पुणे-मुंबई महामार्ग देहू कमान ते भक्ती शक्ती पर्यंत बंद राहील. तळवडे आयटी पार्क चौक ते खंडेलवाल चौक हा मार्गही वाहतुकीस बंद असेल. देहूगावातील संत तुकाराम महाराज मंदिराकडे जाणारे अंतर्गत रस्ते देखील बंद ठेवण्यात येणार आहेत. पालखी ८ जुलै रोजी पिंपरी-चिंचवड शहरात येणार आहे. त्यावेळी भक्ती शक्ती पासून पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद असेल. खंडोबा माळ ते टिळक चौक, त्रिवेणीनगर चौक ते दुर्गामाता चौक, थरमॅक्स चौक ते खंडोबा माळ चौक,
म्हाळसाकांत चौक ते खंडोबा माळ चौक, काळभोर नगर, अप्पूघर, काचघर चौक येथून भक्ती शक्ती चौक, दळवीनगर ते खंडोबा माळ चौकाकडे आणि सांगवी ते मदर तेरेसा ब्रिजवरून रांका ज्वेलर्स येथे येणारा मार्ग बंद असणार आहे. पिंपरी मध्ये ऑटो क्लस्टर, सम्राट चौक, भाजी मंडई चौक, एच ए चौक, गांधीनगर, साई चौक, बसवेश्वर चौक येथून महामार्गाकडे येणारे मार्ग बंद असतील. नाशिक फाटा आणि पुढे हॅरिस ब्रिज पर्यंत महामार्गावर येणारे मार्ग पालखी सोहळ्यादरम्यान बंद राहणार आहेत.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी ८ जुलै रोजी प्रस्थान करेल. पहिला मुक्काम गांधीवाडा आळंदी येथे होईल. ९ जुलै रोजी पालखी योगीराज चौक, थोरल्या पादुका विसावा, मॅगझीन चौकट बोपखेल फाटा, विश्रांतवाडी मार्गे पुण्याकडे मार्गस्थ होईल. दरम्यान चाकण, चिंबळी, शेलपिंपळगाव, वडगाव घेनंद, मरकळ, भारतमाता चौक, मोशी चौक, विश्रांतवाडी, बोपखेल येथून आळंदी शहराकडे येणारे सर्व मार्ग बंद असतील. भाविकांच्या वाहनांना यामध्ये प्रवेश दिला जाईल.
देहू येथील पार्किंग ठिकाणे
पालखी सोहळ्या दरम्यान देहूगाव येथे येणाऱ्या भाविकांसाठी पाच ठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आली आहे. देहूगाव येथील गायरान मैदान, सीओडी मैदान, खंडेलवाल चौक येथील मैदान, सप्तपदी मंगल कार्यालय, भगीरथी लॉन्स येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी
पालखी सोहळ्या दरम्यान तळेकर पाटील चौक, आदित्य इंटरनॅशनल स्कुल डुडुळगाव, ज्ञानविलास कॉलेज डुडुळगाव, मुंगसे पार्किंग, इंद्रायणी हॉस्पिटल समोर, वडगाव रोड विश्रांतवड, वडगाव चौक, पॉलिबॉन्ड कंपनीसमोर, प्लुमेरिया मंगल कार्यालय, बैलगाडा घाट चऱ्होली, मुक्ताई मंगल कार्यालय येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.






