Illegal Hoardings: पिंपरी-चिंचवडकरांच्या डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार; शेकडो होर्डिंग्ज स्ट्रक्चरल ऑडिटविना उभी
Illegal Hoardings: किवळे दुर्घटनेचा धडा कागदावरच; पावसाळा तोंडावर असूनही पिंपरी-चिंचवडमधील शेकडो होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट रखडले, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

Illegal Hoardings – किवळे मधील होर्डिंग दुर्घटनेने संपूर्ण देश हादरला होता. त्यानंतर मुंबईमधील घाटकोपर भागातही अशाच प्रकारची घटना घडली होती. तरीही पिंपरी-चिंचवड महापालिकेने त्यातून कोणताही धडा घेतलेला दिसत नाही. शहरात शेकडो मोठे जाहिरात फलक उभे आहेत. मात्र त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट अद्याप झालेले नाही. पावसाळा सुरू झाला असतानाही आकाशचिन्ह परवाना विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
त्यामुळे संभाव्य दुर्घटनेची भीती व्यक्त होत आहे. यंदा शहरात दोन वेळा अवकाळी पाऊस झाला. मात्र त्यावेळी वादळी वारे नव्हते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. पण पुढील काही दिवसांत मुसळधार पाऊस आणि वेगवान वारे वाहण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत कमकुवत झालेली होर्डिंग्ज कोसळल्यास मोठी जीवितहानी होऊ शकते. तरीही प्रशासनाने अद्याप होर्डिंग्जच्या सुरक्षिततेची तपासणी सुरू केलेली नाही.
पिंपरी-चिंचवड शहरातून मुंबई बेंगलोर महामार्ग पुणे मुंबई जुना महामार्ग आणि पुणे नाशिक महामार्ग असे तीन प्रमुख रस्ते जातात. या रस्त्यांच्या कडेला परिसरात आणि मोक्याच्या ठिकाणी असलेल्या इमारतींवर अनेक मोठे जाहिरात फलक उभारण्यात आले आहेत. पिंपरी भाजी मंडई, चापेकर चौक यासह शहरातील विविध भागात वर्दळीच्या ठिकाणी अधिकृत होर्डिंग आहेत. मात्र शहरातील अनेक होर्डिंग बेकायदा असल्याचे वेळोवेळी निष्पन्न झाले आहे.
तरीदेखील या अनाधिकृत होर्डिंग वर कारवाई करण्यास महापालिका का धजावत नाही, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी सर्व होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यांचा फिटनेस अहवाल महापालिकेकडे सादर करणे आवश्यक असते. धोकादायक फलक तातडीने हटविण्याची जबाबदारीही प्रशासनाची असते.
मात्र यंदा आकाशचिन्ह परवाना विभागाने एजन्सीधारकांना नोटीस देणे तर दूरच, साध्या सूचना देखील जारी केलेल्या नाहीत. मागील वर्षी काही मोजक्या होर्डिंग्जची तपासणी करण्यात आली होती. यंदा मात्र एकाही होर्डिंगचा फिटनेस अहवाल महापालिकेकडे जमा झाल्याची माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे शहरातील अनेक लोखंडी सांगाडे कोणत्याही तपासणीशिवाय नागरिकांच्या डोक्यावर उभे आहेत.






