Pune Traffic | शहरातील ८५% वाहतूक फक्त ३२ रस्त्यांवर ; महापालिकेच्या पाहणीत धक्कादायक चित्र

प्रभात वृत्तसेवा
पुणे – शहरातील वाढती वाहनांची संख्या, रस्त्यांवरील अतिक्रमणे आणि असंख्य अडथळ्यांमुळे पुण्यातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. शहरातील मुख्य ३२ रस्त्यांवर तब्बल ८५ टक्के वाहतुकीचा भार आहे. या रस्त्यांची एकूण लांबी २०८ किलोमीटर असून, त्यातील तब्बल ६० किलोमीटर अंतर वाहतुकीसाठी अडथळ्यांनी ग्रस्त आहे.
मुख्य चौकांमधील वाहने, आस्थापनांसमोरचे अनधिकृत पार्किंग, रस्त्यांची दुरवस्था, जोडरस्त्यांचे चुकीचे नियोजन, सिग्नलच्या वेळांमधील गोंधळ आणि रस्त्यावरच झालेली अतिक्रमणे यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. या अडथळ्यांचा तातडीने अभ्यास करून त्यावर उपाययोजना सुचविण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी संबंधित विभागांना दिले आहेत.
गेल्या काही वर्षांत पुण्यात वाहतुकीचा वेग लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. वाहनांना दहा किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी तब्बल ३३ मिनिटे लागत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीत पुण्याचा जागतिक क्रमांक चौथा लागतो. वाहतुकीचा वेग वाढविण्यासाठी महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी अनेक उपाय सुरू केले असले, तरी अद्याप ठोस सुधारणा झालेली नाही.
रस्ते रुंदीकरण व मिसिंग लिंक प्रकल्पांना वेळ लागणार असल्याने तातडीचा उपाय म्हणून विद्यमान अडथळे दूर करण्यावर महापालिकेचा भर आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.पथ विभाग, बांधकाम विभाग, क्षेत्रीय कार्यालये, परिमंडळ कार्यालये, अतिक्रमण विभाग, विद्युत विभाग आणि आकाशचिन्ह विभागांतील अधिकारी व अभियंत्यांना यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
तातडीच्या उपाययोजना..
या अडथळ्यांना दूर करण्यासाठी मोठ्या खर्चाची आवश्यकता नाही. रस्त्यांकडेचे पार्किंग बंद करणे, अडथळा ठरणारे फीडर पिलर व पथदिवे हटविणे, सिग्नलच्या वेळांत बदल करणे, खड्डे बुजविणे, अतिक्रमणे काढून रस्ते मोकळे करणे, मुख्य रस्त्यांवर नो-पार्किंगची अंमलबजावणी अशा तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. पुढील चार दिवसांत विभागांनी प्रत्यक्ष पाहणी करून उपाययोजनांची यादीसह अहवाल सादर करायचा आहे.
या रस्त्यांवरील अडथळ्यांची होणार पाहणी..
सोलापूर रस्ता, गणेशखिंड, पुणे- बेंगळुरू महामार्ग (महापालिका हद्द), नगर रस्ता, कोंढवा, कर्वे रस्ता, जुना मुंबई-पुणे महामार्ग, खराडी बायपास, पौड, आळंदी, बाणेर, जंगली महाराज, जुना विमानतळ रस्ता, नवीन व्हीआयपी मार्ग, सिंहगड रस्ता, सेनापती बापट रस्ता, पुणे-सातारा, नॉर्थ मेन रोड, पुणे-सासवड, नेहरू रस्ता, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्ता, धानोरी, शास्त्री रस्ता, बिबवेवाडी, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता, नेहरू चौक-जहाँगीर चौक, मगरपट्टा चौक-खराडी चौक, विद्यापीठ सर्कल-औंध, गोळीबार मैदान-डॉ. आंबेडकर पुतळा चौक, विद्यापीठ सर्कल-पाषाण-बावधन.





