Pune Rain – चाळीशीपार तापमान आणि त्यानंतरच्या ढगाळ वातावरणाने वाढलेल्या उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना सोमवारी अवकाळी पावसाने दिलासा दिला. मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह शहरात दुपारनंतर सुरू झालेल्या अवकाळीने थैमान घातले. उपनगरातील काही परिसरात गारांचा पाऊस झाला. पाषाण विभागात सर्वाधिक ४६ तर लोहगाव येथे ३८ मिमी पावसाची नोंद झाली. शहरात १४ ठिकाणी झाडपडी झाली तर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. अचानक झालेल्या या पावसामुळे पुणेकरांची तारांबळ उडाली. वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने दुकाने, बैठ्या घरांवरील पत्रे उडून गेले. मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानंतर शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडीही झाली. यामुळे आठवड्यातील कामाच्या पहिल्या दिवशी पुण्याचे जनजीवन कमालीचे विस्कळीत झाले. मागील आठवडाभरापासून शहरासह जिल्ह्यात वाढत्या कमाल तापमानाने चाळीशीचा पारा गाठला. परिणामी उन्हाचा चटका अंगाची लाहीलाही करत होता. गेल्या ४८ तासांत ऊन आणि ढगाळ वातावरणामुळे दिवसभर ऊन आणि रात्री हलकासा गारवा असे वातावरण होते. सोमवारी (दि. ३०) सकाळपासून उन्हाचा चटका वाढू लागला. दुपारी कडक ऊन असताना, अचानक आकाशात काळे ढग भरून आले आणि क्षणात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरवात झाली. बाणेर, बालेवाडी, पाषाण, हिंजवडी, कोथरूड, औंध, वारजे परिसरात गारांच्या पावसाने थैमान घातले. शहराच्या मध्यवर्ती भागातील पेठांसह शिवाजीनगर, कोरेगाव पार्क, पर्वती परिसरातही पावसाच्या हलक्या ते मध्यम सरींनी पुणेकरांची धांदल उडवली. माॅडेल काॅलनी येथे झाड पडले. झाडपडी, दुचाकी घसरल्या अवकाळी पावसामुळे १४ ठिकाणी झाडे पडली. यामध्ये प्रभात रोड, बाणेर, सदाशिव पेठ, खडक, गोखलेनगर, ताडीवाला रोड, ,येरवडा, सादलबाबा चौक, सोमवार पेठ आणि कोरेगाव पार्क परिसरात झाडपडीच्या घटना घडल्या. यामुळे कोणतीही मनुष्यहानी झाली नाही, मात्र वाहतूक कोंडीची समस्या काही ठिकाणी झाली होती. यात दोन ठिकाणी गाडीवर तर एक ठिकाणी घरावर झाड पडले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने धोकादायक फांद्या हटवल्या. रस्त्यावर पाणी साचल्याने अनेक ठिकाणी रस्ता निसरडा झाला होता. यामुळे ठिकठिकाणी दुचाकीस्वार घसरुण पडत होते. यामध्ये कोणीही गंभीर जखमी झाले नाहीत. दोन दिवस पावसाचे राज्यातील वाढते तापमान आणि हवामानातील बदलामुळे पुढील दोन ते तीन दिवस पुणे जिल्हा आणि घाटमाथ्यासह मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो आणि ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यात ३१ मार्च आणि १ एप्रिल रोजी मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला असून, पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे कमाल व किमान तापमानात घट होईल. या आठवड्यात ऊन आणि पाऊस सोमवारचा पाऊस पाषाण ४६, लोहगाव ३८, शिवाजीनगर २६.२, मगरपट्टा २५, कोरेगाव पार्क १९, दापोडी १६, बालेवाडी १०, हडपसर ७, राजगुरूनगर ६.५, चिंचवड ५, नारायणगाव ३, हवेली २, तळेगाव १ मिमी.