pune : सायकलचे शहर ही ओळख पुन्हा प्रस्थापित होईल

मुख्यमंत्री फडणवीस; पुणे ग्रॅण्ड टूर २०२६ चे बोधचिन्ह व जर्सी अनावरण
पुणे – पुणे ग्रॅण्ड टूर २०२६ या ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या माध्यमातून पुण्यातील ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि पर्यटनस्थळांचे महत्त्व अधोरेखित होईल आणि पर्यटकांची संख्या वाढेल. राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, तसेच प्रदूषणावर मात करत पुण्याची सायकलचे शहर ही ओळख पुन्हा प्रस्थापित होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
राज्य शासन, पुणे जिल्हा प्रशासन आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या पुणे ग्रॅण्ड टूर २०२६ चे बोधचिन्ह व जर्सी अनावरण समारंभात ते बोलत होते. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आशियाई सायकलिंग महासंघाचे अध्यक्ष दातो अमरजीत सिंग गिल, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव दातो मनिंदर पाल सिंग, आशियाई सायकलिंग महासंघाचे माजी महासचिव ओंकारसिंग, मुख्यमंत्री यांचे सचिव श्रीकर परदेशी आदी उपस्थित होते. या स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर जंगलात आढळणाऱ्या शेकरूवर आधारित स्पर्धेचे इंदू हे शुभंकर जारी करण्यात आले.
मुख्यमंत्री म्हणाले, सायकलचे माहेरघर असलेल्या पुण्यात ही खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय स्पर्धा होत आहे. प्रदूषण आणि जीवनशैलीतील बदलांमुळे उद्भवणाऱ्या आजारांचा विचार करता सायकल चालविण्याला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर पुणे ग्रॅण्ड टूर सायकलिंग संस्कृतीला नवा आयाम देईल.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, सह्याद्रीच्या डोंगररांगातून जाणाऱ्या २०० हून अधिक गावांमधून ही खडतर स्पर्धा होणार आहे. टूर द फ्रान्सपासून प्रेरणा घेत आयोजित होणारी ही स्पर्धा म्हणजे पर्यावरण, आरोग्य आणि शाश्वत जीवनशैलीचे प्रतीक आहे. याद्वारे ग्रामीण पर्यटनासह रोजगारनिर्मिती होईल. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेचे आयोजन होत असल्याचे नमूद करून उपमुख्यमंत्री पवार यांनी अल्पावधीत केलेल्या तयारीबद्दल जिल्हा प्रशासन व सर्व शासकीय यंत्रणांचे अभिनंदन केले.





