pune: पुण्याची जागा भाजपनेच लढवावी
Pune, पुणे शहर आणि जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची वाढलेली ताकद, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील स्पष्ट संख्याबळ आणि मित्रपक्ष आणि स्थानिक आघाड्यांचा पाठिंबा असल्याचा दावा करत विधान परिषदेची जागा भाजपनेच लढवावी,

जिल्ह्यातील आमदारांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी
पुणे – पुणे शहर आणि जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची वाढलेली ताकद, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील स्पष्ट संख्याबळ आणि मित्रपक्ष आणि स्थानिक आघाड्यांचा पाठिंबा असल्याचा दावा करत विधान परिषदेची जागा भाजपनेच लढवावी, अशी मागणी पुणे जिल्ह्यातील आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून केली आहे. यामध्ये महापालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांचाही समावेश होता.
बिडकर यांच्यासह आमदार राहुल कुल, हेमंत रासने, सुनील कांबळे, शंकर जगताप, भीमराव तापकीर, माजी आमदार संजय जगताप, बाळा भेगडे, जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद आदींचा समावेश होता.
विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास २५ मे पासून सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर शहर आणि जिल्ह्यातील आमदारांनी मुख्यमंत्री कार्यालयात फडणवीस यांची भेट घेत पुण्याची जागा भाजपकडे घेण्याविषयी आग्रह धरला.
पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचे स्वतःचे ३०९ सदस्य निवडून आले आहेत. याशिवाय दौंडमधील नागरिक हित संरक्षण मंडळ विकास आघाडीचे १७, इंदापूरमधील कृष्णा भीमा विकास आघाडीचे सात सदस्य भाजपसोबत असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे भाजपकडे ३३३ पेक्षा अधिक मतांचे भक्कम संख्याबळ आहे.
काही अपक्ष सदस्यांचाही पाठिंबा वाढत असल्याचा दावाही या सदस्यांनी केला. बिडकर हे या पदासाठी दावेदार असून, त्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीदरम्यान बिडकर यांनी पक्षाने संधी दिल्यास पूर्ण ताकदीने निवडणूक लढवून विजय मिळवू, असा विश्वास व्यक्त केला आहे.





