Mallikarjun Kharge : मागील दोन वर्षांतील निवडणुका रद्द कराव्यात; मल्लिकार्जुन खर्गे यांची मागणी
कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी मतदारयाद्या पडताळणी (एसआयआर) विरोधात पुन्हा आक्रमक भूमिका मांडली. एसआयआर प्रक्रिया तातडीने थांबवण्यात यावी.

Mallikarjun Kharge : कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी मतदारयाद्या पडताळणी (एसआयआर) विरोधात पुन्हा आक्रमक भूमिका मांडली. एसआयआर प्रक्रिया तातडीने थांबवण्यात यावी. मागील दोन वर्षांतील सर्व विधानसभा निवडणुका रद्द केल्या जाव्यात, या मागण्यांचा पुनरूच्चार त्यांनी केला.
एसआयआरवरून देशभरात मोठे वादळ घोंघावत आहे. त्या प्रक्रियेविरोधात सुरू असलेल्या आंदोलन-निदर्शन सत्राचा उल्लेख खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी स्वातंत्र्यासाठीचा दुसरा लढा अशा शब्दांत केला. ते बिहारमधील एका कार्यक्रमात बोलत होते. मतदारयाद्यांमध्ये फेरफार केला जात आहे. विरोधकांचे समर्थक असणाऱ्या मतदारांची नावे वगळली जात आहेत, असा आरोप करत त्यांनी निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
महाराष्ट्र, हरियाणा, बिहार, पश्चिम बंगाल राज्यांची सत्ता मतचोरीच्या माध्यमातून मिळवण्यात आली. ते विचारात घेऊन जनतेने हक्कांच्या आणि राज्यघटनेच्या रक्षणासाठी रस्त्यांवर उतरून लढावे, असे आवाहन त्यांनी केले. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांना (इव्हीएम) असणारा विरोधही त्यांनी पुन्हा उघड केला. पारदर्शकतेसाठी, जनतेचा विश्वास पुन्हा स्थापित होण्यासाठी निवडणुकांमध्ये मतपत्रिकांचा वापर व्हावा, या आग्रही भूमिकेचाही त्यांनी (Mallikarjun Kharge) पुनरूच्चार केला.






