Medha Kulkarni: टेकडीफोड खपवून घेतली जाणार नाही- खा. कुलकर्णी
Medha Kulkarni:

Medha Kulkarni: कोथरूड येथील स्वामी विवेकानंदनगर लगतच्या टेकडी परिसरात बेकायदेशीर टेकडीफोड करण्यात आली असून, अनधिकृत बांधकामेही केली आहेत, असा आरोप करत महापालिकेने यावर तत्काळ कारवाई करावी. टेकड्यांचे विद्रूपीकरण खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी दिला आहे.
कात्रज- देहूरोड बायपासलगत डुक्करखिंडीजवळ स्वामी विवेकानंदनगर, जिजाईनगर परिसरातील टेकडी फोडून तिथे अनधिकृत प्लॉटिंग, तसेच बांधकाम केल्याची तक्रार करत स्थानिक नागरिकांनी नुकतीच कुलकर्णी यांची भेट घेतली होती. त्यानंतर कुलकर्णी यांनी स्थानिक रहिवासी आणि महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत या परिसराची पाहणी करून हा इशारा दिला.
येथील बेकायदेशीर टेकडीफोड, वृक्षतोड आणि अनधिकृत बांधकामांबाबत स्थानिक नागरिक तीन चार वर्षांपासून लढा देत आहेत. मात्र, दिखाऊ कारवाई केली आहे. ही परिस्थिती गंभीर असून, तातडीने कारवाईची मागणी केल्याचे खासदार कुलकर्णी म्हणाल्या.





