Pune Techie Quits Infosys: दुसरी नोकरी मिळाल्याशिवाय आधीची नोकरी सोडू नये, असा सल्ला अनेकजण देतात. मात्र, पुण्यातील एका इंजिनिअरने लाखो रुपये पॅकेज असलेल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. भुपेंद्र विश्वकर्मा असे या कर्मचाऱ्याचे नाव असून, त्याने इन्फोसिसमधील त्याच्या पदाचा राजीनामा दिला आहे. भुपेंद्र विश्वकर्माने इन्फोसिस सारख्या मोठ्या कंपनीतील नोकरी का सोडली, याचे कारण देखील लिंक्डइन पोस्टमध्ये सांगितले आहे. सध्या सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल होत आहे. इन्फोसिस सारख्या मोठ्या कंपनीतील नोकरी सोडण्याचे कारण काय? भुपेंद्र विश्वकर्माने त्याच्या लिंक्डइन पोस्टमध्ये इन्फोसिस सारख्या कंपनीतील उच्च पगाराची नोकरी सोडण्याची 6 कारणे दिली आहेत. भुपेंद्रने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले की, 3 वर्षांपासून कठोर परिश्रम व चांगली कामगिरी करूनही वार्षिक पगार वाढ मिळाली नाही. कोणतीही पगारवाढ न करता सिस्टम इंजिनिअर ते सीनियर सिस्टम इंजिनिअर अशी बढती मिळाली. जर पगारवाढच झाली नाही, तर प्रमोशन कसले. याशिवाय, टीममधील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्यात आली. नवीन कर्मचारी घेतले नाहीत व कामाचा अतिरिक्त भार आधीच्या कर्मचाऱ्यांवरच टाकला गेला. आधीच नुकसानीत असलेल्या प्रोजक्टवर नियुक्ती करण्यात आली, ज्याचा थेट परिणाम पगारवाढ व करिअरवर झाला. यामुळे पुढे जाण्याचा कोणता मार्गच नव्हता. अवास्तव अपेक्षा आणि किरकोळ मुद्द्यांवर वारंवार होणाऱ्या तक्रारींमुळे तणाव निर्माण होत असे. वारंवार टाकल्या जाणाऱ्या दबावामुळे वैयक्तिक हितासाठी जागा उरली नव्हती, असेही त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले. कामासाठी सहकारी आणि वरिष्ठांकडून कौतुक झाले. मात्र, त्याचा परिणाम ना पदोन्नतीवर दिसून आला ना पगारवाढीवर. परिश्रमाला केवळ ग्राह्य धरण्यात आले. ऑनसाइट भूमिका गुणवत्तेवर आधारित नसून विशिष्ट भाषा बोलणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिली जात असे. हिंदी भाषा बोलणाऱ्यांच्या जागी तेलगु, तमिळ आणि मल्याळम भाषा बोलणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जात असे, असेही त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. दरम्यान, भुपेंद्र विश्वकर्माची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून, अनेक कर्मचारी या पोस्टवर त्यांचा अनुभव शेअर करत आहेत.