Stock Market: इन्फोसिसच्या दमदार ताळेबंदाचा बाजारावर प्रभाव; सेन्सेक्स–निफ्टीत तेजी

मुंबई – तिसर्या तिमाहीत इन्फोसिस कंपनीचा महसूल वाढला आहे. त्याचबरोबर आगामी काळातही महसूल वाढण्याची शक्यता कंपनीने व्यक्त केली आहे. त्यामुळे इन्फोसिस कंपनीसह माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील इतर कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. परिणामी जागतिक नकारात्मक परिस्थितीतही शेअर बाजाराचे निर्देशांक वाढण्यास मदत झाली.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 187 अंकांनी वाढून 83,570 अंकावर बंद झाला. सकाळी सेन्सेक्स तब्बल 752 अंकांनी वाढला होता. मात्र नंतर नफेखोरी होऊन निर्देशांकाला ही पातळी कायम ठेवता आली नाही. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 28 अंकांनी म्हणजे 0.11 टक्क्यांनी वाढून 25,694 अंकावर बंद झाला. निर्देशांक सध्या कमी पातळीवर असल्यामुळे बर्याच कंपन्यांच्या शेअरचे भाव कमी पातळीवर आहेत. अशा परिस्थितीत काही गुंतवणूकदारांनी निवडक खरेदी केल्यामुळे निर्देशांकांना आधार मिळाला.
इन्फोसिस कंपनीच्या शेअरच्या भावात 5.67% वाढ झाली. या कंपनीचा तिसर्या तिमाहित महसूल 8.9% वाढून 45, 479 कोटी रुपये इतका झाला आहे. तर आगामी काळात या कंपनीचा महसूल तीन ते साडेतीन टक्क्यांनी वाढण्याची शक्यता कंपनीने ताळेबंदात व्यक्त केली आहे. या कंपनीबरोबरच टेक महिंद्रा, एचसीएल टेक, स्टेट बँक, एचडीएफसी बँक, या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. इरटर्नल, एशियन पेंट्स, भारत इलेक्ट्रॉनिक्स, सन फार्मा, मारुती या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली.
भारत अमेरिका व्यापार करार होण्याची शक्यता वाणीज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर पुढील आठवड्यात भारत आणि युरोपियन समुदायादरम्यान मुक्त व्यापार करार होणार असल्याचे बाजारात बोलले जात आहे. इन्फोसिस कंपनीने चांगला ताळेबंद जाहीर केल्यामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्राबाबत आशावाद निर्माण झाला आहे. दरम्यान परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी बुधवारी 4,781 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली तर देशातील संस्थागत गुंतवणूकदारानी 5,217 कोटी रुपयांचे शेअरची खरेदी केली.
क्षेत्र वाढ /घट
मिडकॅप +0.15%
स्मॉल कॅप -0.45%
माहिती तंत्रज्ञान + 3.39 %
सरकारी बँका + 1.12 %
नैसर्गिक वायू + 0.43%
ग्राहक वस्तू – 1.37%
भांडवली वस्तू – 1.23%





