मुंबई – अमेरिकेने एकतर्फी भारताविरोधात 50 टक्के आयात शुल्काची घोषणा केल्याचा नकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारावर कायम आहे. याच कारणामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात विक्री करीत आहेत. अशा परिस्थितीत सलग तिसर्या दिवशी शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 270 अंकांनी कमी होऊन 79, 809 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 74 अंकांनी म्हणजे 0.30 टक्क्यांनी कमी होऊन 24,426 अंकावर बंद झाला. ज्या वस्तूच्या निर्यातीवर अमेरिकेने आयात शुल्क लावले आहे त्या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वेगाने घट होत आहे. कारण या कंपन्यासमोर उत्पादन कायम ठेवण्याचा आणि कामगारांना कायम ठेवण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामध्ये कातड्यापासून तयार केलेल्या वस्तू निर्मात्या आणि दागिने उत्पादक कंपन्यांचा जास्त प्रमाणात समावेश आहे. ज्या कंपनीच्या शेअरच्या भावात घट झाली. त्यामध्ये महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, एनटीपीसी, टाटा मोटर्स, टेक महिंद्रा या कंपन्यांचा समावेश होता. आयटीसी, भारत इलेक्ट्रॉनिक्स, ट्रेंन्ट, लार्सन अँड ट्युबरो या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली. एफएमसीजी, इंडस्ट्रियल्स, भांडवली वस्तू, ग्राहक वस्तू क्षेत्राच्या निर्देशांकात वाढ झाली. मात्र इतर सर्व क्षेत्राच्या निर्देशांकात घट झाली. दरम्यान रिलायन्स इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांची रिलायन्स जिओ कंपनी आयपीओ जारी करणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातही काम सुरू करणार असल्याचे अंबानी यांनी सांगितले. रिलायन्स जिओ आता जागतिक व्यासपीठावरही आपले नशिब आजमावणार आहे. मात्र तरीही रिलायन्स इंडस्ट्रीच्या कंपनीच्या शेअरच्या भावात आज बरीच घट झाली. गेल्या तीन दिवसांमध्ये सेन्सेक्स 1,826 अंकांनी तर निफ्टी 540 अंकांनी म्हणजे 0.16 टक्क्यांनी कोसळला आहे. अमेरिकेच्या आयात शुल्काचा भारतातील विविध क्षेत्रावर नेमका किती परिणाम होणार आहे याचे मूल्यांकन सध्या गुंतवणूकदार करीत आहेत. त्यामुळे आगामी आठवडाभर तरी शेअर बाजार निर्देशांक अस्थिर राहण्याची शक्यता असल्याचे विश्लेषकांनी सांगितले. जागतिक अस्थिर परिस्थितीमुळे परदेशी गुंतवणूकदारांचा विक्रीचा मारा चालूच आहे. गुरुवारी या गुंतवणूकदारांनी 3,856 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. मात्र देशातील संस्थागत गुंतवणूकदारानी 6,920 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. मात्र तरीही गुरुवारी शेअर बाजाराचे निर्देशांक एक टक्क्याने कमी झाले होते. 11.21 लाख कोटी रुपयांचे नुकसान अमेरिकेच्या आयात शुल्कामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक गेल्या तीन दिवसात जवळजवळ सव्वा दोन टक्क्यांनी कोसळल्यामुळे शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे एकत्रित बाजार मूल्य 11.21 लाख कोटी रुपयांनी कमी होऊन 443 लाख कोटी रुपयांवर आले आहे.