Stock Market: कृत्रीम बुद्धिमत्तेचा आयटी कंपन्यांच्या कामकाजावर नकारात्मक प्रभाव पडण्याच्या शक्यतेमुळे गुंतवणूकदारांनी गेल्या काही आठवड्यात माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरची एकतर्फी विक्री केली. त्यामुळे या कालावधीत या कंपन्यांचे बाजार मूल्य 47 अब्ज डॉलरने कमी झाली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मध्यंतरी या क्षेत्राबाबत काही प्रमाणात सकारात्मक वातावरण निर्माण झाले होते. मात्र जेफरीज या ब्रोकरेज संस्थेने इन्फोसिस, टीसीएस, एचसीएल टेक्नॉलॉजी, एलटीआय माइंडट्री, एमफायसीस, हेक्सावेअर टेक्नॉलॉजीज या कंपन्यांच्या कामकाजावर कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली. त्यानंतर पुन्हा या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची विक्री चालू झाली आहे. या कंपन्यांच्या शेअरच्या भावात आणखी 33% पर्यंत घट होऊ शकते असे या संस्थेने सुचित केले. टीसीएसच्या शेअरचा भाव 18.27%, इन्फोसिस कंपनीच्या शेअरचा भाव 23.92% कमी झाला. अशा परिस्थितीत जागतिक आऊट सोर्सिंग मॉडेलवर कृत्रिम बुद्धिमत्तेचा परिणाम होणार असल्याचे सांगितले जात आहे. अमेरिकेतील सेल्सफोर्स या कंपनीच्या शेअरचा भाव गेल्या एक महिन्यात 18 टक्क्यांनी कोसळला आहे. पेपाल कंपनीच्या शेअरचा भाव 49 टक्क्यांनी, आयबीएम कंपनीच्या शेअरचा भाव 34 टक्क्यांनी कोसळला. युरोप मधील इमाम या सॉफ्टवेअर कंपनीच्या शेअरचा भाव 33 टक्क्यांनी कोसळला आहे मात्र इन्फोसिस कंपनीचे सहसस्थापक नंदन निलेकने यांनी सांगितले की काळाच्या ओघात माहिती तंत्रज्ञानाची उपयोगिता गुंतवणूकदारांना आणि इतरांना पटेल. प्रत्येक क्षेत्रात काही दशकानंतर बदल होत असतात. तसा बदल आयटी कंपन्यात होणार आहे. भारतीय कंपन्या यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत. मात्र अँथ्रॉपिक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅरीओ अमिदेई यांनी सांगितले की ज्या कामात वारंवारता असते अशी कामे कृत्रिम बुद्धिमत्ता कमी मनुष्यबळावर वेगात पूर्ण करू शकणार आहे. त्यामुळे जुने रोजगार जातील आणि नव्या तंत्रज्ञानावर आधारित नवे रोजगार उपलब्ध होणार आहेत.