Stock market: रुपयाच्या विक्रमी घसरणीचा शेअर बाजारावर परिणाम; सेन्सेक्स 114 अंकांनी घसरला
Stock market: “रुपयातील सततची घसरण आणि महागडे कच्चे तेल हे बाजारासाठी सध्या सर्वात मोठे चिंतेचे कारण ठरत आहे.”

Stock market: सेन्सेक्स आणि निफ्टी मंगळवारी दिवसअखेरीस घसरणीसह बंद झाले. रुपयाने डॉलरच्या तुलनेत विक्रमी नीचांकी पातळी गाठल्याने तसेच कच्च्या तेलाच्या वाढत्या दरांमुळे गुंतवणूकदारांमध्ये सावधगिरीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी, शेवटच्या सत्रात ब्लू-चिप समभागांमध्ये विक्रीचा दबाव वाढला.
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 114.19 अंकांनी म्हणजेच 0.15 टक्क्यांनी घसरून 75,200.85 अंकांवर बंद झाला. दिवसाच्या व्यवहारात मात्र निर्देशांकाने 431 अंकांची उसळी घेत 75,746.27 या उच्चांकाला स्पर्श केला होता. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 31.95 अंकांनी घसरून 23,618 अंकांवर बंद झाला.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील संभाव्य लष्करी कारवाई तात्पुरती स्थगित केल्याचे जाहीर केल्यानंतर जागतिक बाजारात सुरुवातीला सकारात्मक वातावरण निर्माण झाले होते. कतार, सौदी अरेबिया आणि यूएईच्या विनंतीनंतर हा निर्णय घेतल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.
बँकिंग आणि ब्लू-चिप समभागावर दबाव –
एचडीएफसी बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांसारख्या वजनदार समभागांमध्ये विक्री वाढल्याने बाजारावर दबाव आला. कोटक महिंद्रा बँक, अल्ट्राटेक सिमेंट, टायटन, अदानी पोर्ट्स, भारती एअरटेल आणि सन फार्मा हे प्रमुख घसरणारे समभाग ठरले.
तर आयटी क्षेत्रातील समभागांनी बाजाराला काहीसा आधार दिला. इन्फोसिस, एचसीएलटेक, टेक महिंद्रा आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्या समभागांत वाढ झाली.
रुपया विक्रमी नीचांकीवर –
भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत 96.60 या विक्रमी नीचांकी पातळीपर्यंत घसरला. अखेरीस तो 96.52 वर स्थिरावला. दुसरीकडे, ब्रेंट क्रूडचा दर प्रति बॅरल 110 डॉलरच्या आसपास राहिल्याने आयात खर्च वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
अदानी समूहाच्या समभागांत तेजी –
गौतम अदानी आणि त्यांचे पुतणे सागर अदानी यांच्यावरील सर्व फौजदारी आरोप अमेरिकेच्या न्याय विभागाने कायमस्वरूपी मागे घेतल्याने अदानी समूहाच्या बहुतांश समभागांमध्ये तेजी दिसून आली.
तज्ज्ञांचे मत –
जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले की, “इराण संदर्भातील तणाव कमी होण्याच्या आशेने बाजारात सुरुवातीला तेजी होती. मात्र रुपयाची घसरण आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे शेवटी बाजार लाल निशाणीत बंद झाला.”
लाइव्हलाँग वेल्थचे संशोधन विश्लेषक हरिप्रसाद के. यांच्या मते, “रुपयातील सततची घसरण आणि महागडे कच्चे तेल हे बाजारासाठी सध्या सर्वात मोठे चिंतेचे कारण ठरत आहे.”





