Pune Suicide Statistics: पुण्यात साडेतीन वर्षांत ३ हजार ४२६ जणांची आत्महत्या; धक्कादायक कारण समोर
Pune Suicide Statistics:

Pune Suicide Statistics – मागील महिनाभरात पुणे शहरात आत्महत्यांच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली असून, तरुण व्यावसायिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक अशा विविध वयोगटांतील नागरिकांनी आरोग्य, मानसिक तणाव, आर्थिक अडचणी, बेरोजगारी, तसेच कौटुंबिक आणि वैयक्तिक कारणांमुळे टोकाचे पाऊल उचलल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
पुणे शहर पोलिसांच्या आकडेवारीनुसार, गेल्या साडेतीन वर्षांत शहरात एकूण ३ हजार ४२६ जणांनी आत्महत्या केल्या. यामध्ये ८१५ महिला आणि २ हजार ६११ पुरुषांचा समावेश आहे. पुरुषांच्या आत्महत्यांचे प्रमाण महिलांच्या तुलनेत तिपटीहून अधिक असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. २०२३ मध्ये २०९, २०२४ मध्ये २३७ आणि २०२५ मध्ये २५१ महिलांनी आत्महत्या केल्या, तर २०२६ च्या पहिल्या सहामाहीत ११८ महिलांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे.
पुरुषांच्या बाबतीत २०२३ मध्ये ७४०, २०२४ मध्ये ६९१, २०२५ मध्ये ७५७ आणि २०२६ च्या पहिल्या सहामाहीत ४२३ पुरुषांनी आत्महत्या केल्या आहेत. विशेषत: हा करोनानंतर पुरुषांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. करोनामध्ये पुरुषांना बेरोजगारी आणि आर्थिक अडचणींमुळे कुटुंबाचा गाडा चालवणे अशक्य झाले होते. यातूनच अनेकांनी आत्महत्येचा पर्याय निवडला.
म्हणून वाढल्या पुरुषांच्या आत्महत्या
मृणाल घोळे मापुस्कर (क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट) म्हणाल्या, की सध्या शिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी महिलांची संख्या वाढली असून, नातेसंबंधांतील अपेक्षा, स्वातंत्र्याची जाणीव आणि जीवनशैलीतही बदल झाले आहेत. काही कुटुंबांमध्ये परस्परांतील संवादाचा अभाव, वाढलेल्या अपेक्षा आणि तडजोडीच्या कमतरतेमुळे वैवाहिक तणाव निर्माण होत आहेत. दुसरीकडे काही पुरुषांना आर्थिक जबाबदाऱ्या,
सामाजिक अपेक्षा आणि स्वतःचा स्वाभिमान यांचा मोठा मानसिक ताण सहन करावा लागतो. विशेषतः कोरोनानंतर अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, उत्पन्न कमी झाले किंवा आर्थिक स्थैर्य ढासळले. कर्ज, कर्जाचे थकीत हप्ते, कुटुंबाचा वाढता खर्च आणि त्यातून निर्माण होणारे पती-पत्नीतील वादामुळे काही पुरुष तीव्र मानसिक तणावात जातात. अशा परिस्थितीत वेळेवर मानसिक आधार, समुपदेशन आणि कुटुंबातील संवादाचा अभाव टोकाचे निर्णय घेण्याचा धोका वाढू शकतो.
“शहरातील आत्महत्यांचे वाढते प्रमाण ही गंभीर बाब आहे. सामाजिक आणि आर्थिक अपेक्षांचे ओझे, आर्थिक अपयशामुळे अनेक पुरुष आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. महिलांच्या आत्महत्यांमागे प्रामुख्याने कौटुंबिक वाद आणि घरगुती तणाव कारणीभूत असतो.”
– गौहर हसन, उपायुक्त, गुन्हे शाखा






