पुणे : मोठ्या क्षमतेच्या टाक्या बांधण्याचे काम ऑगस्टपर्यंत पूर्ण होईल. त्या नंतर सप्टेंबरपासून शिवाजीनगर मतदारसंघातील सर्व भागांना पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होऊ शकेल. त्यामुळे पाण्याची समस्या सुटेल, अशी ग्वाही आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली.
मतदारसंघातील पाणीपुरवठ्याचा आढावा घेण्यासाठी त्यांनी मंगळवारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. “गेली दोन वर्षे यासंदर्भातील विकास कामांचा पाठपुरावा केल्यानंतर, आता त्याला चांगले स्वरुप येऊ लागले आहे. पाणीपुरवठ्याच्या अकरापैकी दहा झोनमधील कामे ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार आहेत. विशेषतः सात ठिकाणी मोठ्या क्षमतेच्या टाक्या बांधण्यात येत असल्याने पाणी पुरवठ्याचा दाब वाढणार आहे, असे शिरोळे यांनी सांगितले.
येत्या ऑगस्टपर्यंत टाकी बांधण्याचे, तसेच काही ठिकाणी नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्याचा फायदा शिवाजीनगर मतदारसंघातील सर्वच भागातील नागरिकांना होणार आहे. “हा मतदारसंघ पर्वती जलकेंद्रापासून लांब असल्याने, येथे पाणीपुरवठ्याची समस्या भेडसावते.
आमदार झाल्यापासून ही समस्या सोडवण्यासाठी मी कार्यरत आहे. येत्या ऑगस्टपर्यंत साठवण टाक्या बांधण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यालगतच्या सर्व परिसरात पुरेशा दाबाने व्यवस्थित पाणीपुरवठा सुरू होईल,’ असे आमदार शिरोळे यांनी नमूद केले.