Misuse of water: पाण्याच्या गैरवापर आता पालिका कसा रोखणार?
Misuse of water:

कारवाईसाठी कर्मचाऱ्यांचा अभाव
Misuse of water: पाण्याच्या बेसुमार गैरवापरावर दंडात्मक कारवाईचा बडगा महापालिकेने उभारला आहे. मात्र ही कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे सध्या कर्मचारीच नाहीत, अशी परिस्थिती आहे. अशा स्थितीत दिवाळीनंतरच आता कारवाई होणार असे दिसते.
पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. दोन वेळा दंडात्मक कारवाई आणि तिसऱ्यांदा फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिकेने प्रसिद्धीपत्रकात दिला आहे. मात्र या इशाऱ्याप्रमाणे कारवाई करणारेच महापालिकेकडे कर्मचारी नाहीत.
दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता वाॅशिंग सेंटर्स, सोसायट्या, सार्वजनिक नळकोंडाळे, खासगी जलतरण तलाव आदी ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
त्यासाठी दंडाची रक्कमही ठरवण्यात आली आहे. परंतु त्याची अंमलबजावणी करण्याला माणसेच नसल्याने आता कारवाई कोण करणार, असा प्रश्न महापालिकेसमोर निर्माण झाला आहे.
दिवाळीचे दिवस वगळता आठवड्याला एकदा पाणीपुरवठा बंद करून पाणीकपात सुरू आहेच, दिवाळीनंतर एक दिवस आड पाणीपुरवठा करावा लागणार आहे.
त्यातून दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजन आणि अन्य दिवसांमध्ये गाड्या धुणे, घरातील साफसफाईसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर केला जातो. सणासुदीत कारवाई करण्याबाबत शिथीलता असते. दिवाळीनंतर तरी कारवाईला कर्मचारी मिळतील का, हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.





