Pune Rural Police: पुणे ग्रामीण पोलिसांसमोर मोठं आव्हान! अपघातांचे आकडे पाहून सरकार हादरलं; दिलं ‘हे’ विशेष लक्ष्य
Pune Rural Police: तीन वर्षांतील मृत्यूंचे आकडे चिंताजनक; पायाभूत सुविधांमधील सुधारणांसह ग्रामीण भागात व्यापक रस्ता सुरक्षा जनजागृती मोहीम.

Pune Rural Police – राज्यातील प्रत्येक पोलीस विभागाला रस्ता अपघातांमध्ये १० टक्के घट करण्याचे उद्दिष्ट दरवर्षी दिले जाते. राज्यात सर्वाधिक रस्ते मृत्यूंची नोंद पुणे ग्रामीण पोलीस हद्दीत झाल्याने सरकारने त्यांना तब्बल १५ टक्के अपघात कमी करण्याचे विशेष लक्ष्य दिले आहे. हे आव्हान स्वीकारत अपघातप्रवण ठिकाणांवर विशेष उपाययोजना राबविण्यात येणार असल्याची माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी दिली.
पुणे ग्रामीण पोलीस हद्दीतून पुणे-अहमदनगर, पुणे-सोलापूर, पुणे-सातारा, पुणे-नाशिक, पुणे-महाड, नगर-कल्याण या राष्ट्रीय व राज्य महामार्गांसह अनेक प्रमुख मार्ग जातात. तसेच पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाचा काही भागही यात येतो. त्यामुळे या मार्गांवर सातत्याने गंभीर व जीवघेणे अपघात घडतात. पुणे ग्रामीणमध्ये अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या चिंताजनक आहे. २०२२ मध्ये ९४७, २०२३ मध्ये १,०९३, तर २०२४ मध्ये ९६७ जणांचा मृत्यू झाला. ही संख्या महाराष्ट्रातील इतर कोणत्याही पोलीस घटकापेक्षा अधिक असल्याने पुणे ग्रामीणला वेगळे लक्ष्य दिले आहे.
ब्लॅक स्पॉटची पाहणी
अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक बांधकाम, महसूल आणि अन्य संबंधित शासकीय यंत्रणांच्या समन्वयाने तीन संयुक्त समित्या स्थापन केल्या आहेत. या समित्या अपघातग्रस्त ब्लॅक स्पॉटची प्रत्यक्ष पाहणी करून चालकांची दृश्यमानता वाढविणे, रस्त्यांवरील त्रुटी दूर करणे आणि आवश्यक पायाभूत सुधारणासाठी उपाययोजना सुचविणार आहेत.
दुभाजकांतील घुसखोरी बंद
महामार्गांवरील दुभाजकांमध्ये नागरिकांनी तयार केलेले बेकायदा कट (पंक्चर) अपघातांचे प्रमुख कारण आहेत. हे सर्व बेकायदा मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होतील. पायाभूत सुविधांतील सुधारणा करण्याबरोबरच ग्रामीण भागात व्यापक रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर मोठ्या प्रमाणात धावणाऱ्या अवजड वाहनांच्या हालचालींवर विशेष लक्ष ठेवून नियमभंग करणाऱ्यांवर कार/वाई केली जाणार आहे.
“रस्ते अपघातांमधील मृत्यू कमी करण्याचे आव्हान आम्ही स्वीकारले आहे. सर्व विभागांच्या समन्वयातून पायाभूत सुविधा सुधारणा, ब्लॅक स्पॉट दुरुस्ती, बेकायदा कट बंद करणे आणि जनजागृती अशा सर्वसमावेशक उपाययोजनांवर भर दिला जाणार आहे.”
– संदीपसिंह गिल्ल(पोलीस अधिक्षक,पुणे जिल्हा)






