प्रभात वृत्तसेवा पुणे – पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नवले पूल परिसरातील वाढत्या अपघातांचे प्रमाण थांबवण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने सुरू कराव्यात, असे आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले आहेत. ही माहिती पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. नवले पूल परिसरातील अलीकडील भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर मोहोळ यांनी बुधवारी रात्री नवी दिल्ली येथे नितीन गडकरी यांची भेट घेऊन अपघाताची कारणमीमांसा व सुधारणा उपायांवर सविस्तर चर्चा केली.मोहोळ म्हणाले की, नवले पुलाजवळील अपघातप्रवण ‘ब्लॅक स्पॉट्स’ कमी करण्यासाठी केंद्र व राज्यस्तरावर करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती गडकरी यांना दिली. तथापि, अलीकडील अपघातानंतर अधिक प्रभावी आणि तातडीच्या उपाययोजनांची गरज असल्याकडे त्यांचे लक्ष वेधले. पुण्यात महापालिका, पीएमआरडीए, जिल्हा प्रशासन, पोलीस आणि महामार्ग प्राधिकरण यांच्या संयुक्त बैठकीत निश्चित झालेल्या उपाययोजनांचा अहवालही गडकरी यांच्याकडे सादर करून तातडीच्या निर्देशांची मागणी केली, असे त्यांनी सांगितले. बैठकीत या मुद्यांवर झाली चर्चा – अपघात टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनांवर चर्चा – एनएचएआयमार्फत रस्त्याची पुनर्रचना करणे – खेड-शिवापूर टोल नाक्यावर वाहनांचा लोड तपासणीची काटेकोर अंमलबजावणी – टोल नाक्यावर आरटीओमार्फत वाहनांची यांत्रिक तपासणी – वेगमर्यादेवर कठोर नियंत्रण – सिग्नल व बॅरिकेडिंग यंत्रणेतील सुधारणा – धोकादायक ठिकाणांची पुनर्रचना – ठराविक अंतरावर रम्बलर स्ट्रिप्सची संख्या वाढवणे “नवले पूल येथील अपघात थांबावेत, यासाठी नितीनजी गडकरी यांची भेट घेऊन बैठकांचा अहवाल सादर केला. त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.” – मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री, सहकार व नागरी विमान वाहतूक