FDA Pune: जंकफूड आजपासून एफडीएच्या रडारवर! शाळांच्या ५० मीटर परिसरातील अस्थापनांंना इशारा
FDA Pune: शाळांच्या ५० मीटर परिसरात जंकफूड विक्री करणाऱ्यांवर एफडीएची करडी नजर; अन्न सुरक्षा कायद्यानुसार होणार कारवाई.

FDA Pune – शाळांच्या परिसरात सोमवारपासून हाय फॅट, हाय शुगर, हाय सॉल्ट (एचएफएसएस) अर्थात जंक फूड पदार्थ विकणाऱ्या आस्थापनांविरुद्ध अन्न आणि औषध प्रशासनाकडून धडक कारवाई करण्यात येणार आहे. या परिसरात एचएफएसएस पदार्थविक्री केल्याचे आढळल्यास अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पुणे विभागाचे सहआयुक्त दि. वा. भोगावडे यांनी दिली आहे.
दरम्यान, अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत पुणे विभागात दि. ११ ते १४ ऑगस्ट २०२६ या कालावधीत हॉटेल, रेस्टॉरंट, ई-कॉमर्स आणि डेअरी आस्थापनांची तपासणी करून अस्वच्छता, तसेच अन्न सुरक्षा आणि मानकांशी संबंधित नियमांचे पालन न केल्याचे आढळल्याने १६ आस्थापनांचे परवाने, तसेच नोंदणी निलंबित करण्यात आली.
यामध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड, लोणावळा, सांगली, कोल्हापूर, कराड, साताऱ्यातील हाॅटेल्स आणि रेस्टाॅरंटचा समावेश आहे. पुण्यात लोहगाव येथील हाॅटेल चूल मटण, भोसरीतील सिम्पली साऊथ, हाॅटेल पवन, वानवडीतील जेबीएम हाॅस्पिटॅलिटी (कँटीन), कॅम्प येथील बर्गर किंग, डाॅमिनोज पिझ्झा यांचा समावेश आहे. यातील जेबीएम हॉस्पिटॅलिटी (कँटीन) विनापरवाना व्यवसाय करत असल्याचे आढळल्याने व्यवसाय बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.
ई-कॉमर्स आस्थापनांमध्ये लोहगाव येथील झेप्टो लिमिटेड, वारजे जकात नाका येथील स्विन्स्टा ईएनटी प्रायव्हेट लिमिटेड, नऱ्हे आणि भवानी पेठ येथील ब्लिंक कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. खेड, लोणी, सातारा येथील डेअरी आस्थापनांवरही अस्वच्छतेमुळे कारवाई केली आहे. अन्नपदार्थांचा दर्जा अथवा स्वच्छतेबाबत तक्रारी असल्यास नागरिकांनी १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.





