Pune: पेठांमधील रस्ते आठ दिवसांत खड्डेमुक्त करू

पुणे – गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. पण, मध्यवर्ती पेठांमध्ये सर्वाधिक गणेश मंडळे असल्याने देशभरातून भाविक पुण्यात येतात. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने पेठांसह या भागांना जोडणारे रस्ते पुढील आठ दिवसांत खड्डेमुक्त करण्याचा दावा केला आहे.
गणेशोत्सवाच्या तोंडावर खराब झालेले, खचलेले तसेच खाली-वर झालेल्या चेंबरची दुरुस्ती केली जाणार आहे. विशेषत: भाविकांना चालण्यासाठी पदपथ अडथळेमुक्त केले जाणार आहेत. ही माहिती मनपा पथ विभागाचे अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे यांनी दिली. मागील आठवड्यात यासाठी स्वतंत्र पथक नेमण्यात आले आहे, असे दांडगे यांनी सांगितले. रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती तसेच कामाचे नियोजन करण्यासाठी सात झोन करण्यात आले आहेत. या प्रत्येक झोनची जबाबदारी कार्यकारी अभियंत्यांकडे आहे.
मात्र, गणेशोत्सवासाठी विशेष बाब म्हणून या सातही कार्यकारी अभियंत्यांकडे पेठांची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांना रस्ते वाटून देण्यात आले आहेत. त्यांनी आपल्या झोनमधील उप अभियंते आणि कनिष्ठ अभियंत्याचे पथक तयार करून त्यानुसार नेमून देण्यात आलेल्या रस्त्याची आधी पाहणी करायची आहे. त्यावर असलेले खड्डे, चेंबर, पदपथ आणि इतर समस्या जाणून घ्यायच्या आहेत. त्यानुसार तातडीने दुरुस्तीची कामे करून घ्यायची आहेत. उत्सवाच्या चार दिवस आधी ही कामे पूर्ण करणे बंधनकारक आहे.
“गणेशोत्सवासाठी सर्वाधिक भाविक पेठांच्या भागांत येतात. मुख्य मिरवणुकाही याच भागांतून निघतात. मात्र, रस्त्यांवर खड्डे असल्यास अडथळे निर्माण होतात. गणेश मंडळांकडून ही बाब महापालिकेच्या समन्वय बैठकीत निदर्शनास आणून देण्यात आली होती. त्यानुसार तातडीने कामे पूर्ण करणार आहोत.” – साहेबराव दांडगे, अधीक्षक अभियंता, पथ विभाग.




