Pune Ganesh Visarjan 2025 : 1 डीजे किंवा 1 ढोल-ताशा पथक…; मानाच्या गणपतींच्या विसर्जनाच्या वेळा ठरल्या, केले ‘हे’ मोठे बदल

Pune Ganesh Visarjan 2025 : पुण्यातील गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सण नसून सामाजिक, सांस्कृतिक आणि सामुदायिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. लोकमान्य टिळकांनी सन १८९३ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा सुरू केली आणि तेव्हापासून हा उत्सव पुण्याच्या ओळखीचा सर्वात मोठा सांस्कृतिक वारसा ठरला आहे.
दरवर्षी गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंतचे दहा दिवस पुण्यात भक्ती, आनंद, कला आणि एकतेचं अप्रतिम वातावरण अनुभवायला मिळतं. अनंत चतुर्दशीच्या दिवशी काढली जाणारी विसर्जन मिरवणूक ही पुण्याची ओळख आहे. ढोल-ताशांच्या गजरात, लेझीमच्या तालावर आणि भजनांच्या स्वरात मिरवणूक रंगते. हजारो नागरिक आणि भाविक यात सामील होऊन या परंपरेचा उत्साह अधिक वाढवतात.
पुण्यातील मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीचं वेळापत्रक आणि नियमावली पुणे पोलिसांनी जाहीर केली आहे. यावर्षीच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत शांतता आणि शिस्त राखण्यासाठी कठोर नियम लागू करण्यात आले आहेत.
मानाचे गणपती आणि मिरवणुकीचे वेळापत्रक :
– सकाळी 9:15 वाजता: पहिला मानाचा कसबा गणपती मंडईतील टिळक पुतळ्यासमोर पोहोचेल.
– सकाळी 9:30 वाजता: कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात होईल आणि हा गणपती बेलबाग चौकात पोहोचेल.
– सकाळी 10:15 वाजता: कसबा गणपती लक्ष्मी रोडकडे प्रस्थान करेल.
– सकाळी 10:30 वाजता: दुसरा मानाचा गणपती (तांबडी जोगेश्वरी) बेलबाग चौकातून लक्ष्मी रोडकडे जाईल.
– दुपारी 1:00 वाजता: सहावा (महापालिका गणपती) आणि सातवा (त्वेष्ट कासार गणपती) मंडळ मिरवणुकीत सामील होतील.
– दुपारी 3:45 वाजता: लक्ष्मी रोड आणि शिवाजी रोडवरील मंडळे मुख्य मिरवणुकीत सामील होतील.
– दुपारी 4:00 वाजता: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मिरवणुकीत सामील होईल.
– संध्याकाळी 5:30 नंतर: जिलब्या मारुती आणि अखिल मंडई गणपती मंडळे मिरवणुकीत सामील होतील.
मिरवणुकीसाठी महत्त्वाचे नियम :
टिळक पुतळा ते बेलबाग चौक या दरम्यान ढोल-ताशा वाद्य वाजवण्यास सक्त मनाई आहे. बेलबाग चौकानंतरच ढोल-ताशा वाजवण्यास परवानगी दिली जाईल. प्रत्येक मंडळाला फक्त 1 DJ किंवा 1 ढोल-ताशा पथक ठेवण्याची परवानगी आहे. प्रत्येक ढोल-ताशा पथकात जास्तीत जास्त 60 सदस्य असावेत.
गणेश मंडळांनी मिरवणुकीदरम्यान आपापसात योग्य अंतर ठेवावे आणि रेषा तोडू नये. कसबा गणपती अलका टॉकीज चौकाजवळ पोहोचेपर्यंत इतर मंडळांना त्या ठिकाणी थांबण्यास परवानगी नाही. तसेच, टिळक रोड, कुमठेकर रोड आणि केळकर रोडवरील मिरवणुका सकाळी 10:30 पूर्वी सुरू होणार नाहीत.
बेलबाग चौकात परिशिष्ट 1, 2 आणि 3 मधील मंडळांना प्राधान्य दिले जाईल. इतर मंडळांना प्रथम येणाऱ्याला प्रथम संधी या तत्त्वावर प्रवेश दिला जाईल. पुणे पोलिस आयुक्तालयाने पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. या नियमांचे पालन करून मिरवणूक सुरळीत पार पाडण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.





