Lonavala Ganeshotsav | लोणावळ्यात जल्लोषात गणरायाला निरोप ; पण शेवटी नाराजीचे सुर का?

प्रभात वृत्तसेवा
लोणावळा – अकरा दिवसांच्या मुक्कामानंतर लोणावळ्यातील लाडक्या गणरायाला रविवारी जल्लोषपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. गुलालाची उधळण, ढोल-ताशांचा निनाद, डीजेचा दणदणाट, बेंजोच्या झंकारासह भाविकांचा गणपती बाप्पा मोरयाचा गजर या सर्वांनी शहर दुमदुमून गेले. लहान वारकरी टाळ-मृदंगाच्या तालावर ठेका धरत होते, तर मंडळांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात उत्साहाने मिरवणुकीत सहभाग घेतला.
सुमारे नऊ तास चाललेल्या या मिरवणुकीत लोकांची मोठी गर्दी उसळली होती. मात्र, मिरवणुकीला झालेल्या विलंबामुळे शेवटच्या गणेश मंडळांना विसर्जनासाठी घाई करावी लागली आणि त्यामुळे नाराजीची भावना निर्माण झाली.सायंकाळी ५.३० वाजता शेतकरी पुतळा चौकातून मिरवणुकीला सुरुवात झाली आणि रात्री २.३० वाजता नगरपरिषद विसर्जन हौद येथे समारोप झाला. या दीर्घकाळ चाललेल्या मिरवणुकीदरम्यान शहर आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गणरायाला निरोप दिला. मिरवणुकीच्या मार्गावरून जाताना ढोल-ताशांचा दणदणाट, गुलालाच्या उधळणीमुळे संपूर्ण शहर भक्तीभावाने रंगून गेले होते.
मिरवणुकीच्या मार्गावर विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्थांनी स्वागत कक्ष उभारले होते. जयचंद चौक व छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून अनुक्रमे अन्नदान आणि लाडू वाटप झाले. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, काँग्रेस, मनसे, वंचित बहुजन आघाडी व नगरपरिषद यांच्यावतीनेही मंडळांचे स्वागत करण्यात आले. आमदार सुनील शेळके यांनी मंडळांचे स्वागत केले. माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, मुख्याधिकारी अशोक साबळे तसेच इतर पक्षांचे पदाधिकारी मंडळांच्या अध्यक्षांचा सत्कार करण्यासाठी उपस्थित होते.
शांतता आणि शिस्त राखण्यासाठी लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस यंत्रणा दिवसरात्र कार्यरत होती. वाहतूक व्यवस्थेसाठी स्वतंत्र पथके तैनात होती. गर्दी असूनही कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही हे समाधानकारक ठरले.
भाविकांसाठी सेवा उपक्रम..
विसर्जनासाठी आलेल्या भाविकांना व कार्यकर्त्यांना सत्यानंद तीर्थधाम आश्रम भांगरवाडी यांच्यावतीने महाप्रसाद, रामदेव बाबा भक्त मंडळाकडून भेळ, तर लायन्स क्लबकडून चहाचे वाटप करण्यात आले. हजारो भाविकांनी व कार्यकर्त्यांनी या सेवांचा लाभ घेतला.
मिरवणुकीत उमटला नाराजीचा सुर..
सुरुवातीच्या मंडळांनी वेळ घेतल्याने शेवटच्या मंडळांना विसर्जनासाठी घाई करण्यात आली. यामुळे शेवटच्या गणेश मंडळांमध्ये प्रचंड नाराजी पसरली. एकीकडे भक्तिमय जल्लोषात विसर्जन पार पडले असले तरी दुसरीकडे झालेल्या अव्यवस्थेमुळे शेवटच्या मंडळांच्या नाराजीची नोंद यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत झाली.





