Satara Accident : सातारा-रहिमतपूर रस्त्यावर भीषण अपघात! कार ३ वेळा उलटली; एका महिलेचा जागीच मृत्यू
Satara Accident : सातारा ते रहिमतपूर मार्गावर कार झाडावर आदळून भीषण अपघात; खटाव तालुक्यातील महिलेचा मृत्यू, दोघे जिल्हा रुग्णालयात दाखल.

Satara Accident – सातारा ते रहिमतपूर मार्गावर तासगावच्या हद्दीत इनोव्हा कार झाडावर आदळून पलटी झाली. बुधवारी पहाटे एकच्या सुमारास झालेल्या या अपघातात खटाव तालुक्यातील गुरसाळे येथील सौ. सुनीता धनाजी जाधव (वय 36) यांचा जागीच मृत्यू झाला. लतीफ मुलाणी (वय 33) आणि धनाजी शिवाजी जाधव (वय 48, दोघेही रा. गुरसाळे) हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.
अधिक माहिती अशी, लतीफ मुलाणी, धनाजी जाधव आणि सुनीता जाधव मंगळवारी रात्री इनोव्हा (एमएच 50 एई 6676) कारमधून सातारा- रहिमतपूर रस्त्यावरुन जात असताना तासगाव गावाच्या हद्दीत रस्त्यालगत असलेल्या झाडावर इनोव्हा कार जोरात आदळली. त्यानंतर कारने दोन, तीन पलट्या घेतल्या. यावेळी संगीता जाधव या कारमधून बाहेर फेकल्या गेल्या आणि कार त्यांच्यावर अंगावर पडली.
यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर धनाजी जाधव आणि लतीफ मुलाणी हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीम आणि हायवे रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. सुमारे अर्धा तासाच्या अथक प्रयत्नांनंतर महिलेला वाहनाखालून बाहेर काढण्यात आले. अपघातातील जखमी लतीफ मुलाणी आणि धनाजी जाधव यांना उपचारासाठी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
बचावकार्यात श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमचे चंद्रसिंग पवार, रोहित बनसोडे, ऋषिकेश रंकाळे, देवा गुरव, अथर्व बीडकर, अभिजित शेलार तसेच हायवे रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी सहभाग घेतला. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून वाहनाचा वेग, चालकाचा ताबा सुटणे किंवा अन्य कारणांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.





