PUNE : सेंट मीरा महाविद्यालयात हस्ताक्षर विश्लेषण कार्यशाळा; विद्यार्थ्यांना करिअर निवडीसाठी मार्गदर्शन
PUNE :

PUNE : विद्यार्थ्यांना स्वतःच्या क्षमता, आवडीनिवडी आणि व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देत योग्य शैक्षणिक व व्यावसायिक दिशा निवडण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने सेंट मिराज कॉलेजच्या बीबीए आणि बीसीए विभागातर्फे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी हस्ताक्षर विश्लेषण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
श्रीमती काजल जैसिंघानी यांच्या समन्वयाने आयोजित या कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास आणि करिअरविषयक जाणीव समृद्ध करण्याच्या दृष्टीने विशेष महत्त्व होते.
प्रसिद्ध हस्ताक्षर विश्लेषक झैनब कपाडिया यांनी या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. हस्ताक्षर विश्लेषणाची मूलभूत माहिती देतानाच स्वतःमधील गुणवैशिष्ट्ये आणि क्षमता जाणून घेण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. करिअरची निवड करताना स्वतःच्या आवडी, क्षमता आणि ध्येय यांचा विचार करून निर्णय घेण्यास विद्यार्थ्यांना त्यांनी प्रोत्साहित केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात श्रीमती काजल जैसिंघानी यांनी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना स्वतःची ओळख निर्माण करण्यास आणि भविष्यातील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी योग्य दिशा ठरविण्यास मदत होते, असे सांगितले. यावेळी सेंट मीरा महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. सुवर्णा देवळाणकर यांच्या हस्ते सुश्री झैनब कपाडिया यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या समन्वयक डॉ. रमा वेंकट यांनी आपल्या मनोगतात झैनब कपाडिया या सेंट मिराज महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी असल्याचा आवर्जून उल्लेख केला. याच महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात झाली, ही महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. माजी विद्यार्थिनीने आपल्या कार्यकर्तृत्वातून वेगळी ओळख निर्माण करणे, ही सध्याच्या विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी बाब आहे.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. नीरू भगत यांनी या उपक्रमाला मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, स्व-ओळख आणि भविष्यातील करिअरविषयक निर्णयक्षमता वृद्धिंगत करण्यासाठी अशा उपक्रमांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते.





