Pune Crime : दारूच्या नशेत वाहन चालवून रस्त्यालगतच्या वाहनांना धडक; महिला जखमी
Pune Crime : पुण्यातील एमआयटी कॉलेज रोडवरील घटना; चालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Pune Crime : दारूच्या नशेत भरधाव वाहन चालवून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांना धडक दिल्याची घटना एमआयटी कॉलेज रोडवर गुरुवारी रात्री आठच्या सुमारास घडली. या अपघातात एक महिला जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी वाहनचालकाला मारहाण केल्याचेही समजते.
वल्लभ बाळासाहेब बोडके (वय २४, रा. पानमळा, सिंहगड रोड, पुणे) असे संबंधित वाहनचालकाचे नाव आहे. तो एमएच १२ जेझेड ९६४६ क्रमांकाच्या वाहनातून एमआयटी कॉलेज रोडने पौड रोडच्या दिशेने जात होता. त्यावेळी त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांना धडक बसून अपघात झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले. तो दारूच्या नशेत वाहन चालवत होता का, याची खातरजमा करण्यासाठी त्याला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अपघातात जखमी झालेल्या महिलेबाबत अधिक माहिती घेण्यात येत असून, पोलिसांकडून पुढील तपास आणि कायदेशीर कारवाई सुरू आहे.





