Pune Potholes: स्मार्ट सिटीत खड्ड्यांचे राज्य! रस्ते बनले मृत्यूचे सापळे; अपघातांच्या मालिकेने नागरिक हैराण
Pune Potholes: पुण्यातील प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांवर खड्ड्यांचा विळखा; दुचाकीस्वारांच्या मान, मणका अन् पाठीच्या दुखापतींत मोठी वाढ.

Pune Potholes – स्मार्ट सिटीचा गाजावाजा करणाऱ्या पुण्यातील रस्त्यांची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली आहे. शहरातील प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांवरील प्रचंड खड्ड्यांनी वाहनचालकांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. अनेक ठिकाणी खड्डे इतके खोल आणि मोठे आहेत की दुचाकी, चारचाकी वाहनांची चाके त्यात अडकून वाहने बंद पडत आहेत. अचानक खड्ड्यात वाहन आदळल्याने मान, मणका,
पाठ आणि कंबरेला गंभीर दुखापती होत असून ज्येष्ठ नागरिक, महिला वाहनचालकांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात वाहनांचा तोल जाऊन दररोज अपघात घडत आहेत. विशेषतः दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पावसाचे पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
नागरिकांच्या मते, रस्त्यांवरून प्रवास करणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. खड्ड्यांचा सर्वाधिक फटका शहरातील वाहतुकीलाही बसत आहे. अनेक चौकांतील सिग्नलजवळ मोठे खड्डे पडल्याने वाहने अतिशय संथ गतीने पुढे सरकत आहेत. परिणामी, हिरवा सिग्नल मिळाल्यानंतरही काहीच वाहने चौक ओलांडू शकतात आणि पुन्हा लाल दिवा लागतो.
अनेक ठिकाणी वाहनचालकांना एकाच चौकात दोन ते तीन वेळा सिग्नलची प्रतीक्षा करावी लागत असल्याने प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे.करदात्यांच्या पैशातून कोट्यवधी रुपये खर्च करून रस्त्यांची कामे केली जात असतानाही प्रत्येक पावसाळ्यात रस्त्यांचे खड्ड्यांमध्ये रूपांतर होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. वारंवार तात्पुरती डागडुजी करून प्रशासन जबाबदारी झटकत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.





