Pune Police: ..तर ध्वनीक्षेपक जप्त! छुप्या पद्धतीने डीजे लावला तर थेट गुन्हे; पोलिसांचा दहीहंडीनिमित्त तगडा बंदोबस्त
Pune Police: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ध्वनीक्षेपकांसाठी नियमावली जाहीर; मर्यादा ओलांडल्यास पोलीस प्रत्यक्ष तपासणी करून ध्वनीक्षेपक जप्त करणार.

Pune Police – दहीहंडीनिमित्त शनिवारी मध्यभागासह शहरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. ध्वनीक्षेपकांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पोलिसांकडून काटेकोरपणे पालन करण्यात येणार आहे. ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त ध्वनीक्षेपक वापरल्यास पोलिसांनी कारवाईचा इशारा दिला आहे. तसेच मध्यभागातील बहुतांश रस्त्यांवर शनिवारी सायंकाळनंतर वाहतूक बदल करण्यात येणार आहेत.
लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, छत्रपती शिवाजी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता, गणेश पेठेतील महाराणा प्रतापसिंह रस्ता, कसबा पेठेतील गणेश रस्ता परिसरात वाहतूक बदल केले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ध्वनीक्षेपकांबाबत पोलिसांनी नियमावली निश्चित केली आहे. शहरातील मध्यभागासह उपनगरातील सार्वजनिक मंडळांनी दहीहंडीची तयारी सुरू केली आहे.
शुक्रवारी दुपारपासून अनेक भागातील रस्ते वाहतुकीसाठी सजावटीच्या कामानिमित्त बंद केले आहेत. अनेक मंडळांनी लेझर झोत, उच्चक्षमतेची ध्वनीक्षेपक यंत्रणा वापरण्यास पसंती दिली आहे. मध्यभागातील मंडळांकडून उत्सव साजरा करण्यात येतो. गेल्या पाच ते सात वर्षांत धनकवडी, वारजे, कोथरुड, सिंहगड रस्ता, विमाननगर, वडगाव शेरी,
कात्रज भागांतील मंडळांकडून दहीहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जात आहे. उच्च क्षमतेची ध्वनिवर्धक यंत्रणा, प्रकाश योजनेंवर लाखो रुपये खर्च करण्यात येतो. गेल्या काही वर्षांपासून दहीहंडी उत्सवाला काही मंडळांकडून विधायक उपक्रमांची जोड देण्यात येत आहे. दहीहंडी उत्सवावर होणारा खर्च टाळून समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात.
…..तर ध्वनीक्षेपक जप्त
दहीहंडी उत्सव, गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी मंडळे उच्च क्षमतेची ध्वनिक्षेपक यंत्रणा वापरतात. यंदा मर्यादेचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्यात येईल. मंडळांनी छुप्या पद्धतीने ध्वनिक्षेपक लावल्यास गुन्हे दाखल करून यंत्रणा जप्त करण्यात येणार आहे. पोलीस ध्वनिक्षेपक यंत्रणेची प्रत्यक्ष तपासणी करणार आहेत.
“ध्वनीक्षेपक यंत्रणेतील प्रेशर मिड, प्लाझ्मा साउंड या उपकरणांचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. नियम धुडकाविल्यास मंडळांविरुद्ध थेट गुन्हे दाखल करून यंत्रणा जप्त करण्यात येईल. दहीहंडी आणि गणेशोत्सवासह वर्षभरातील सर्वच सण-उत्सवांमध्ये आवाजासाठी चार बास, चार टॉप वापर करण्यासाठी परवानगी राहणार आहे.”
– अमितेशकुमार, पोलीस आयुक्त






