pune : भाविकांसाठी पीएमपीची विशेष बससेवा

दिवेघाट बंद असल्याने बोपदेव घाटमार्गे धावणार बस
पुणे – संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या उद्या, गुरूवारी सासवड आणि लोणी काळभोरच्या दिशेने मार्गस्थ होतील,
यावेळी अनेक भाविक पुणे ते सासवड पायी वारी करतात. त्यांच्या परतीच्या प्रवासासाठी पीएमपीने १०० बस उपलब्ध केल्या असून यातील ६० अतिरिक्त आणि ४० नियमीत बस आहेत.
हडपसर-सासवड दरम्यानचा दिवेघाट मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे. त्यामुळे भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी पीएमपी बस दिवेघाटऐवजी बोपदेव घाटमार्गे चालवल्या जातील.
ही पर्यायी बससेवा स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर आणि कात्रज येथून उपलब्ध असेल. तसेच संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मुक्काम सासवड येथे असताना, भाविकांना सासवड-नारायणपूर, केतकावळेतील प्रतिबालाजी मंदिर दर्शनासाठी जाता यावे यासाठी १२ जुलै रोजी २० अतिरिक्त बस सोडण्यात येणार आहेत.





