pune : आज पालख्यांचे शहरातून प्रस्थान

पहाटे साडेपाच वाजता संतांच्या पादुकांना अभिषेक
पुणे – ‘हरली ती भूक तहान निमाली। संतांची देखिलीं चरणांबुजे।।’ अशा भावना मनात ठेवत संतांची आणि वारकऱ्यांची सेवा करून पुणेकर त्यांना शनिवारी निरोप देणार आहेत.
दोन रात्रींच्या मुक्कामानंतर पुणेकरांचा पाहुणचार घेऊन संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुढील मुक्कामी शनिवारी पहाटे सात वाजता निघणार आहेत. तत्पूर्वी संतांच्या पादुकांचा अभिषेक पहाटे साडेपाच वाजता होणार आहे.
आळंदीहून बुधवारी संत ज्ञानेश्वर महाराजांची, तर देहूहून संत तुकाराम महाराजांची पालखी मंगळवारी पंढरपुराच्या दिशेने निघाली. दोन्ही पालख्यांचे गुरुवारी (दि. ९ जुलै) पुणे मुक्कामी आगमन झाले.
गुरुवारी आणि शुक्रवारचा मुक्काम करून शनिवारी पहाटे या पालख्या हडपसरच्या दिशेने रवाना होणार आहेत. त्यांच्याबरोबर अन्य संतांच्या पालख्याही नियोजित मार्गाने मार्गस्थ होतील.
पहाटे साडेपाच वाजता संतांच्या पादुकांचा अभिषेक होईल. त्यानंतर नैवेद्य आणि त्यानंतर पालख्या पुण्यातून मार्गस्थ होणार आहेत. माउलींच्या पादुकांचा अभिषेक झाल्यानंतर शितोळे सरकारांकडून नैवेद्य दाखवला जातो. त्यानंतर पालख्या पुढील मुक्कामी निघतात, अशी माहिती पालखी सोहळ्याचे चोपदार बाळासाहेब चोपदार यांनी दिली.
जर विनाअडथळा पालख्यांना मार्ग मिळाला, तर सुमारे सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास त्या हडपसर येथे विसाव्याला थांबणे अपेक्षित आहे. त्यानंतर दोन्ही पालख्या आपापल्या मार्गाने पुढील मुक्कामी जातील. हडपसर येथे विसावा घेऊन ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवेघाटातून सासवड येथे मुक्कामी आणि संत तुकाराम महाराजांची पालखी सोलापूर रस्त्याने लोणीकाळभोर येथे मुक्कामी जाणार आहे.
अनेक पुणेकर या पालख्यांना निरोप देण्यासाठी हडपसरपर्यंत चालत जातात, तर माउलींच्या पालखीबरोबर अनेक भाविक पुढे दिवेघाटातून पुढे निरोप देण्यासाठी चालत जातात.





