PUNE: नो एंट्रीमधून आलेल्या दुचाकीस्वारामुळे झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू

पुणे – शिवाजी रस्त्यावर रामेश्वर चौकात नो एन्ट्रीमधून जाणाऱ्या एका बेशिस्त दुचाकीस्वारामुळे समोरून येणाऱ्या निष्पाप दुचाकीस्वाराचा डंपर खाली चिरडून बळी गेला. शुभम दादासाहेब डोके (२१, रा. मगरपट्टा हडपसर) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी नो एंट्रीमधून येणाऱ्या अज्ञात दुचाकी आणि डंपरचालक कमलदेव कैलास महतो (रा. झारखंड) याच्यावर फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्त मंदिराकडून रामेश्वर चौकाकडे येणाऱ्या रस्त्यावर सकाळी साडेनऊ ते पावणेदहा या वेळेत अपघात झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी रस्त्यावर एकेरी वाहतूक आहे. शनिवार वाड्याकडून स्वारगेटकडे जाता येते. तर, शिवाजी रस्त्यावरील रामेश्वर चौकातून मंडईकडे आणि मंडईकडून रामेश्वर चौकमार्गे स्वारगेटकडे जाता येते. मात्र,रामेश्वर चौकातून दत्तमंदिराकडे बंदी असतानाही अनेक दुचाकीस्वार आणि रिक्षादेखील उलट दिशेने जात असतात. मंगळवारी सकाळी देखील एक दुचाकीस्वार रामेश्वर चौकातून दत्त मंदिराकडे उलट दिशेने जाण्यासाठी वळाला. त्यावेळी समोरून एक डंपर आणि दुचाकीस्वार येत होते.
उलट दिशेने आलेल्या दुचाकीस्वारामुळे डोके याला त्याच्या गाडीला ब्रेक लावावा लागला. मात्र, डोकेने ब्रेक लावला असता त्याची दुचाकी घसरली आणि तो रस्त्यावर पडला. त्यावेळी शेजारून जाणाऱ्या डंपरचे मागील चाक त्याच्या डोक्यावरून गेले. यात डोकेचा जागीच मृत्यू झाला.
शुभम फार्मसीचा विद्यार्थी
अपघातात मृत्यू झालेला शुभम डोके हा फार्मसीच्या सेकंड इयरचा विद्यार्थी होता. मंगळवारी तो दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आला होता. दर्शन घेऊन परत जातांना अपघात झाला आणि त्यात शुभम डोकेचा मृत्यू झाला.





