Pune: बाळासाहेब शिवरकर यांना उमेदवारी द्या; काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी

विवेकानंद काटमोरे
हडपसर – लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच दहा वर्षांनंतर दलित, ओबीसी, मुस्लिम मतदार यंदा पुन्हा काँग्रेससोबत जोडला गेल्याने हडपसर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना १३ हजार ३८९ मतांची आघाडी मिळाली. त्यामुळे डॉ. कोल्हे यांच्या विजयात हडपसर मतदारसंघात काँग्रेसचा सिंहाचा वाटा ठरला आहे.
काँग्रेसकडे ज्येष्ठ नेते, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार संघात ही आघाडी घेतली असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत येथून बाळासाहेब शिवरकर यांना संधी द्यावी, अशी मागणी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधून होत आहे.
हडपसर विधानसभा मतदारसंघ हा पुणे शहर लोकसभेत येत नसून तो शिरूर लोकसभा मतदारसंघात येत आहे. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघातील हडपसर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसला सोडण्यात यावा आणि हडपसर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी ही माजी राज्यमंत्री तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब शिवरकर यांनाच देण्यात यावी, अशी आग्रही मागणी मतदार संघातील कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वानवडी येथे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या बैठकीत केली आहे. तसा अहवाल व मागणीचे रितसर पत्र आम्ही काँग्रेस पक्ष श्रेष्ठींना देणार असल्याचेही पदाधिकारी यांनी सांगितले.
हडपसर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचा पारंपरिक मतदार महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.अमोल कोल्हे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिल्याने डॉ. कोल्हे यांच्या विजयात एक महत्वाची भूमिका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब शिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस प्रेमी मतदारांनी निभावली, असा दावा येथील काँग्रेस कार्यकर्ते करत आहेत.
महाविकास आघाडीचे सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस मेहनत करून यश पदरात पाडून घेतले. लोकसभेचा निकाल हडपसर विधानसभा मतदार संघातील आगामी राजकारणाला निश्चितच कलाटणी देणारा ठरला असून, सत्ताधारी पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांना चिंतन करणारा ठरला आहे. पक्षापेक्षा व्यक्तिकेंद्रित राजकारण या निवडणुकीत सरस ठरल्याचे सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये बोलले जात आहे. एकूणच डॉ.कोल्हे यांच्या विजयामध्ये बाळासाहेब शिवरकर ‘किंगमेकर’ ठरले असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.
काँग्रेसला ऊर्जितावस्था
गेल्या दहा वर्षांपासून काँग्रेस पक्षामध्ये आणि पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्येही मरगळ भरली होती. परंतु लोकसभेचा या विजयानंतर पक्षाच्या नवीन जन्म झाला असून, काँग्रेसला पुन्हा हडपसर मतदार संघात ऊर्जितावस्था येण्याची चिन्हे दिसत आहेत. या लोकसभा निवडणुकीचा निकालाचा परिणाम येणाऱ्या विधानसभा व पालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये चित्र बदलण्याची शक्यता राजकीय जाणकार वर्तवत आहेत.
हडपसरचा सिंहाचा वाटा
लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.अमोल कोल्हे यांच्या विजयात हडपसर मतदारसंघाचा सिंहाच्या वाटा ठरला. लोकसभा निवडणुकीत मतदारसंघातून डॉ. कोल्हे यांना सर्वाधिक १३ हजार ३८९ मतांची आघाडी मिळाली. २०१४ व २०१९ मध्ये महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना आघाडी मिळाली होती.
पक्षश्रेष्ठींनी कार्यकर्त्यांच्या भावना समजून घ्यायला हव्यात
आजचे हे शक्तिप्रदर्शन नाही तर कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना आहेत. शिवरकर साहेबांना हडपसर मतदारसंघात काँग्रेसची उमेदवारी मिळावी, असा त्यांचा आग्रह आहे. ही कार्यकर्त्यांची भावना आहे. मी तर त्यांचा मुलगा आहे, माझी भावना वेगळी नाही. त्यामुळे येथील राजकीय वातावरण आणि आमच्या भावना साहेबांनी पक्ष श्रेष्ठींच्या भेटी घेऊन त्यांच्या कानावर घालाव्यात, आम्हीं ही पत्रव्यवहार आणि प्रत्यक्ष भेट घेऊन उमेदवारी मागणार आहोत. – अभिजीत शिवरकर, माजी नगरसेवक
काँग्रेसमुळेच लोकसभेला आघाडी
महाविकास आघाडीच्या सोबत असलेल्या काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी झटून काम केले . याशिवाय काँग्रेसला मानणाऱ्या मतदारांनी आघाडीच्या उमेदवाराला भरभरून मतदान केले. त्यामुळे आघाडीच्या उमेदवाराला आघाडी मिळाली आहे. कार्यकर्त्यांना सांभाळून त्यांना जीव लावणारे शिवरकर साहेब आहेत.वेळप्रसंगी त्यांच्या पुढे जाऊन उमेदवारीसाठी लढू. मतदारसंघात पंजा जिवंत रहावा ही आम्हा सर्व कार्यकर्त्यांची प्रांजळ भावना आहे. – दिलीप शंकर तुपे, अध्यक्ष हडपसर विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पार्टी.
अन्यथा सांगली पॅटर्न करू
शिवरकर साहेबांचा स्वभाव हा सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहे. जनतेच्या मनात येते काँग्रेसचा उमेदवार म्हणून बाळासाहेब शिवरकर हे आहेत. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी ही भावना समजून घ्यायला हवी .आत्ताच्या स्थितीमध्ये सर्व समावेशक उमेदवार म्हणून बाळासाहेब शिवरकर हे योग्य आहेत. पक्षाने वेगळा विचार केल्यास आम्हालाही येथे वेगळा विचार करावा लागेल. सांगलीत विश्वजीत होते .तसे, हडपसर मध्ये अभिजीत आहेत त्यामुळे उमेदवारी न दिल्यास येथेही सांगली पॅटर्न होणार. – संजय शेवाळे, चेअरमन- सन्मित्र सहकारी बँक हडपसर
पुणे शहराचा बागुलबुवा येथे नको
हडपसर विधानसभा मतदारसंघ हा पुणे शहराचा भाग नसून तो शिरूर लोकसभेत येत आहे .शिरूर लोकसभेत सहा विधानसभा आहेत त्यात हडपसर विधानसभा एक आहे .त्यामुळे येथे हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला सोडण्यात यायला हवा. लोकसभेला या मतदारसंघात सर्वाधिक आघाडी ही काँग्रेस पक्षामुळेच मिळाली आहे .त्यामुळे या मतदारसंघात बाळासाहेब शिवरकर यांचा विचार काँग्रेस पक्षाने करायला हवा. – प्रशांतमामा तुपे, माजी अध्यक्ष – काँग्रेस पार्टी हडपसर विधानसभा.





