Pune News : विश्वकर्मा विद्यापीठाकडून राष्ट्रीय महिला आयोगाच्या यशोदा एआय 2.0 कार्यक्रमाचे आयोजन
सामाजिक परिवर्तनाला चालना देण्याच्या आपल्या वचनबद्धतेशी कटिबद्ध राहण्याच्या आपल्या भूमिकेला अनुसरून विश्वकर्मा विद्यापीठाने राष्ट्रीय महिला आयोगाच्या वतीने आयोजित (Pune News) करण्यात आलेल्या 'यशोदा एआय २.०' या कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी (२४ जुलै) विद्यापीठाच्या कोंढवा येथील कॅम्पसमध्ये केले.

Pune News : सामाजिक परिवर्तनाला चालना देण्याच्या आपल्या वचनबद्धतेशी कटिबद्ध राहण्याच्या आपल्या भूमिकेला अनुसरून विश्वकर्मा विद्यापीठाने राष्ट्रीय महिला आयोगाच्या वतीने आयोजित (Pune News) करण्यात आलेल्या ‘यशोदा एआय २.०’ या कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी (२४ जुलै) विद्यापीठाच्या कोंढवा येथील कॅम्पसमध्ये केले.
या कार्यक्रमात बचत गटांतील महिला, शिक्षणतज्ज्ञ, प्राध्यापक, विविध क्षेत्रातील व्यावसायिक तसेच सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधींनी सहभाग घेतला. राष्ट्रीय महिला आयोगाच्या देशव्यापी मोहिमेचा भाग असलेल्या या उपक्रमाचा उद्देश (Pune News) महिलांना डिजिटल अर्थव्यवस्थेत सक्षम सहभागासाठी आवश्यक ज्ञान व आत्मविश्वास प्रदान करणे तसेच ‘विकसित भारत’ या संकल्पनेला बळकटी देणे हा आहे.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी महिलांनी केवळ तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या न राहता भारताच्या डिजिटल परिवर्तनात सक्रिय योगदान देता आले पाहिजे, असे सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्तेचे ज्ञान हे आजच्या काळातील अत्यावश्यक जीवनकौशल्य बनले असून महिलांनी नव्या तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर करण्यासाठी स्वतःला सक्षम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
याप्रसंगी बोलताना त्या म्हणाल्या, “महिला उद्योजकांसाठी डिजिटल सक्षमीकरण अत्यंत आवश्यक आहे. बचत गटातील महिलांनी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आपल्या उत्पादनांचे विपणन, जाहिरात आणि माहिती प्रसारित करावी. त्यामुळे त्यांचा व्यवसाय विस्तारेल, आर्थिक स्वावलंबन प्राप्त होईल आणि येत्या काळात देशाच्या सकल देशांतर्गत उत्पन्नात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहणार आहे.”
विश्वकर्मा विद्यापीठाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. वासुदेव गाडे म्हणाले, “महिला सक्षमीकरणासाठी आम्ही विद्यापीठ म्हणून कटिबद्ध आहोत. आमच्या विद्यापीठात ६३ टक्के महिला प्राध्यापक आहेत आणि नऊपैकी पाच शैक्षणिक विभागांचे नेतृत्व महिलांकडे आहे. त्या विद्यापीठाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. समकालीन प्रश्नांवर उत्तर शोधण्याची क्षमता शिक्षणामध्ये आहे, असा आमचा विश्वास आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता आता अपरिहार्य आहे. त्यामुळे महिलांनी तिच्यापासून दूर न जाता स्वतःच्या विकासासाठी तिचा प्रभावी वापर करावा. बचत गटांना विपणन, जाहिरात तसेच उत्पादने आणि सेवांच्या गुणवत्तेची खात्री करून त्यांचा व्यापक स्तरावर प्रसार करण्यासाठी प्रशिक्षण देण्यासाठी आम्ही आयोग तसेच जिल्हा प्रशासनाबरोबर काम करण्यास उत्सुक आहोत.”
या कार्यक्रमात महावीर फाउंडेशनच्या तज्ज्ञांनी तांत्रिक सत्र घेतले. या सत्रात महिलांना डिजिटल साधनांचा प्रभावी वापर, ऑनलाइन बाजारपेठांचा लाभ आणि उद्योगवृद्धीसाठी आवश्यक डिजिटल कौशल्यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
यशोदा एआय २.० कार्यक्रमाचे आयोजन करून विश्वकर्मा विद्यापीठाने नवोपक्रम, ज्ञानविनिमय आणि समाजाभिमुख उपक्रमांचे केंद्र म्हणून आपली भूमिका अधिक दृढ केली आहे. अशा उपक्रमांद्वारे भविष्योन्मुख कौशल्यांनी विद्यार्थ्यांना आणि समाजाला सक्षम बनविण्याबरोबरच सर्वसमावेशक, डिजिटलदृष्ट्या सक्षम आणि कृत्रिम बुद्धिमत्तेची जाण असलेल्या भारताच्या निर्मितीसाठी विद्यापीठ कटिबद्ध असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
या कार्यक्रमाला (Pune News) राष्ट्रीय महिला आयोगाचे उपसंचालक रामावतार सिंह, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद, पुणे यांचे प्रकल्प संचालक श्रीकांत खरात तसेच विश्वकर्मा विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक प्रा. डॉ. ललित वाधवा यांची प्रमुख उपस्थिती होती.






