Devendra Fadnavis : इन्फ्रा मॅन आणि विकासाचे राजकारण – हरिदास चरवड

महाराष्ट्राच्या राजकारणात आणि विकासाच्या पटलावर गेल्या दशकात एका नावाची चर्चा सातत्याने होत राहिली आहे, ते नाव म्हणजे देवेंद्र फडणवीस. सत्ता येते आणि जाते, पण राजकीय नेत्याची ओळख ही त्याने मागे सोडलेल्या कामाच्या ठशांवरून ठरते. फडणवीस यांच्याबाबतीत हा ठसा पायाभूत सुविधांचा विकास अर्थात इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून उमटला आहे. म्हणूनच विरोधकांसाठी राजकीय टीकेचा सोयीस्कर मुद्दा असला तरी फडणवीस साहेब हे आज समर्थकांसाठी व राज्यासाठी इन्फ्रा मॅन आहेत.
२०१४ नंतर महाराष्ट्रात पायाभूत सुविधांच्या विकासाला एक वेगळीच गती मिळाली, यात शंका नाही. गेल्या तीन दशकांत साचलेला विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी फडणवीस यांनी अनेक मेगा-प्रोजेक्ट्सची मुहूर्तमेढ रोवली आणि ते पूर्णत्वाकडे नेले. नागपूर आणि मुंबई या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारा समृद्धी हा द्रुतगती मार्ग विदर्भ आणि मराठवाड्याच्या आर्थिक विकासाचा कणा ठरत आहे.
मुंबई ट्रान्स-हार्बर लिंकमुळे नवी मुंबई आणि मुंबईतील अंतर काही मिनिटांवर आले असून, प्रादेशिक दळणवळणाला एक नवी दिशा मिळाली आहे. मुंबईतील वाहतूक कोंडीवर पर्याय म्हणून उभे राहिलेले मेट्रोचे जाळे असो किंवा पुण्यात प्रदूषणमुक्त आणि वेगवान प्रवासासाठी सुरू झालेली पुणे मेट्रो; मेट्रो प्रकल्पांमुळे शहरांचे रूपडे बदलले आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेसवे मिसिंग लिंक, कोस्टल रोड, वाढवण बंदर, मिहान प्रोजेक्ट आणि ग्रामीण भागाला शहरांशी जोडणारे रस्ते यांमुळे महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने एका नव्या इन्फ्रा युगाचा प्रारंभ झाला. केवळ काँक्रीटचे रस्ते आणि पूल उभारण्यापुरते फडणवीस यांचे काम मर्यादित राहिले नाही. जलयुक्त शिवारसारख्या योजनांच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त भागांत जलसंधारणाची कामे करून त्यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही बळ देण्याचा प्रयत्न केला. कागदावरचे प्रकल्प प्रत्यक्षात उतरवून सर्वसामान्यांच्या रोजच्या जगण्यात सुलभता आणल्यामुळेच जनतेने त्यांना इन्फ्रा मॅन ही उपाधी दिली आहे.
पुण्यात घातले लक्ष
राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहराला मुंबईजवळ नजिकता असूनही किंवा मुंबईजवळ असल्यामुळेच कायम दुय्यम स्थान दिले जाते अशी पुणेकरांची ओरड असते. देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याकरता जे धडाकेबाज निर्णय घेतले आहेत त्यामुळे भविष्यात कोणाची ही ओरड राहणार नाही, पुणेकर शतप्रतिशत खुश होतील यात शंका नाही.
सगळ्यांत महत्वाचे म्हणजे पुरंदर विमानतळाचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला. पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. पाताळलोक भूयारी मार्ग, पुणे जिल्हा रिंग रोड, एमआरडीसी रिंगरोड ही त्याची ठळक उदाहरणे. मेट्रोचे जाळे विस्तारते आहे. ग्रीन पुणे, भोवतालची कोंडी फोडण्यासाठी दोनच दिवसांपूर्वी उदघाटन झालेले तीन मोठे रस्ते प्रकल्प अशा माध्यमातून फडणवीस साहेबांचे पुण्याकडे पूर्ण लक्ष असल्याचे लक्षात आल्याशिवाय राहत नाही.
राजकीय वाद, टीका आणि आव्हाने
पण राजकारणाचा महामार्ग कधीच खड्डेमुक्त नसतो! राजकीय वर्तुळात प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. फडणवीस यांची हीच इन्फ्रा मॅनची प्रतिमा विरोधकांच्या निशाण्यावरही राहिली आहे. विरोधी पक्षांनी या प्रतिमेवर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा कायमच प्रयत्न केला आणि करत आहेत. तथापि, फडणवीस हे कायम अविचल आणि कार्यमग्न राहीले. त्यामुळे सर्वसामान्य महाराष्ट्रीय जनतेच्या जीवनमानात निश्चितच बदल घडत आहेत व येणाऱ्या पीढ्यांनाही या बदलाची फळे चाखता येतील, त्यांना नव्या संधी उपलब्ध होतील आणि त्यांचे आयुष्य गतीमान राहील.
पावसाळ्यात राज्यातील शहरांचा प्रश्न बिकट होतो. पाऊस आता पूर्वीसारखा राहीला नाही असे म्हणायची वेळ आली आहे. पूर्वी त्याच्या येण्याला एक शिस्त आणि संयम होता. आता मात्र तो विखंडीत स्वरूपात येतो. अल्पकाळात मुसळधार बरसतो. मुसळधार पावसामुळे शहरांची दैना होते. शहरांमध्ये साचणारे पाणी, रस्त्यांवर पडणारे खड्डे, आणि मुंबई-पुणे एक्सप्रेसवे मिसिंग लिंकसारख्या ठिकाणी घडलेले स्लॅब कोसळण्यासारखे प्रकार यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला गेला.
विशेषत: राज्याचे प्रमुख म्हणून माननीय देवेंद्रजी फडणवीसच निशाण्यावर राहीले. मात्र त्यांनी ही सर्व टीका संयमाने पचवली. राज्यात विकास होतो आहे हे सर्वज्ञात आहे. तथापि, कुठे काही उणीव राहीली अथवा मानवी नियंत्रणा बाहेरच्या काही घटना घडल्या आणि त्यावर कोणता तत्काळ इलाज नसेल तर इन्फ्रामॅन फडणवीसांसारखे नेतृत्वही क्षणभर स्तब्ध होते मात्र; पुन्हा नव्या जोमाने ते कामालाही लागतात.
विरोधी बाजूकडून चौफेर कोंडी करण्याचे आणि अगदी शेलक्या शब्दांत दुषणे देण्याचा प्रयत्न झाला तरी देवेंद्र फडणवीस नावाचा हा विकासपुरूष किंचितही नाउमेद झालेला पाहायला मिळत नाही. किंबहुना त्यांच्यावर झालेल्या शरसंधानातून नवी प्रेरणा घेत दुप्पट वेगाने पुढे जाताना ते दिसतात. मोठ्या प्रकल्पांसाठी ते आग्रही आहेतच. मात्र ते करताना शहरांच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष होणार नाही याची दक्षता ते बाळगतात हीच अभ्यासू नेत्याची खरी ओळख असते.
इन्फ्रास्ट्रक्चर ही केवळ सिमेंट-रेतीची बांधकामे नसतात, तर तो राज्याच्या भविष्याचा पाया असतो. फडणवीस यांनी महाराष्ट्राला गती देणारे अनेक मोठे प्रकल्प उभे केले. मात्र, प्रकल्पांची अंमलबजावणी, कामाचा दर्जा आणि नैसर्गिक आपत्तीच्या वेळी शहरांची होणारी दुरवस्था यामुळे निर्माण होणारे प्रश्नही तितकेच वास्तववादी असतात. त्याचीही त्यांना जाण असल्यामुळे प्रत्येक वेळी याचा विचार करूनच त्यांच्याकडून योजनांना आकारणी दिली जाते आणि अंमलबजावणीचे निर्णय घेतले जातात.
एकीकडे समर्थकांच्या नजरेत ते राज्याला आधुनिकतेकडे नेणारे इन्फ्रा मॅन आहेत, तर महाराष्ट्राच्या जनतेलाही एक तरूण, उमदा आणि विकासाचा ध्यास असलेला आणि विकासाचेच राजकारण करणारा एक तडफदार नेता मिळाला आहे. राज्य उद्योग आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रात मागे पडले असल्याची लाख हकाटी पिटली जात असली तरी वास्तव तसे नाही, हे देवेंद्रजींनी देशभरात उपलब्ध आकडेवारीवरूनही सिद्ध करून दाखवले आहे. महाराष्ट्राचा हा इन्फ्रा मॅन आधुनिक महाराष्ट्राची वाटचाल अशीच गतीमान ठेवणार यात शंका नाही.
– हरिदास चरवड, नगरसेवक पुणे महापालिका
बी.ई. (सिव्हिल), एम. ई. (टाऊन प्लॅनिंग)





