Pune News : पुण्यात विनापरवाना फ्रेशर्स पार्टी; हॉटेल मालक व इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीवर गुन्हा दाखल
पुणे : मुंढवा परिसरातील वडबन येथे असलेल्या हॉटेल पियो गार्टनमध्ये परवानगी न घेता “अनऑफिशिअल फ्रेशर्स ४.०” नावाची भव्य पार्टी आयोजित करण्यात आली. या प्रकरणी हॉटेल मालक, जनरल मॅनेजर तसेच इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवारी रात्री झालेल्या या कार्यक्रमात तब्बल ८०० ते १००० तरुण-तरुणी सहभागी झाले होते. मात्र, आयोजकांनी कोणतीही शासकीय परवानगी न घेता पार्टीचे आयोजन केले. वाहनतळाची सोय न करता ग्राहकांची वाहने रस्त्याच्या कडेला उभी केल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी आंदोलन केले होते.
गुन्हा दाखल व्यक्तींची नावे हॉटेल मालक फैज अली, आक्शा कारीया, जनरल मॅनेजर सचिन यादव, इव्हेंट मॅनेजर हॅनक, ईडीएम वर्ल्ड इव्हेंट कंपनीचे मालक अक्षय स्वामी, ऋषभ खाडे आणि आयुष बजाज अशी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार पार्टीचे आयोजन रविवारी (१७ ऑगस्ट) सायंकाळी करण्यात आले होते. मात्र पोलिसांनी १६ ऑगस्ट रोजीच हॉटेल मालकांना परवाने सादर करण्याचे आदेश दिले होते. तरीदेखील आदेश धाब्यावर बसवून पार्टीचे आयोजन करण्यात आले.
दरम्यान, पार्टी संपल्यानंतर मद्यधुंद अवस्थेतील तरुणांनी रस्त्यावर धिंगाणा घालत दारूच्या बाटल्या फोडल्या. स्थानिक रहिवाशांनी आक्षेप घेतल्यावर तरुणांनी शिवीगाळ केली. त्यामुळे नागरिक आणि हॉटेल मालक यांच्यात वाद निर्माण झाला. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
तात्काळ मुंढवा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक माया देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे





