Pune News : काका-पुतण्यांचे वाढदिवस; पुण्यात राज ठाकरे अन् आदित्य ठाकरेंचे एकत्र बॅनर!

pune news : राजकारणात कधी काय घडेल याचा काही नेम नाही. राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो. सध्या राज्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्याला कारणदेखील तसेच आहे. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरेंनी सिने अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना दिलेली मुलाखत.
मुलाखतीत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंशी युती करण्यास तयारी दर्शवली. या मुलाखतीनंतर राज्यात ठाकरे बंधूं एकत्र येणार? या चर्चांनी जोर धराला आहे. दोन्ही पक्षातील नेते सकारात्मक असून कार्यकर्त्यांचेही स्थानिक पातळीवर मनोमिलन सुरू झालं आहे. मात्र ठाकरे ब्रँड नेमका एकत्र कधी येणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
असे असतानाच ठाकरे बंधूंच्या दोन्ही पक्षांत एक नवा उत्साह संचारला आहे. त्याची प्रचिती पुण्यात पाहायला मिळाली आहे. राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांना एकाच बॅनरमध्ये एकत्र वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. सध्या हा बॅनर चांगलाच व्हायरल झाला आहे.
आज (9 जून) राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. असे असताना पुण्यातील शिवसैनिकांकडून चौका-चौकामध्ये आदित्य ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आले आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षातल्या कार्यकर्त्यांची आतापासूनच मनाची तयारी केल्याचे पाहायला मिळत आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि मनसे पक्ष एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे दोन्ही पक्षांतील काही नेत्यांनी याला युतीला समर्थन दिले आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर चांगलेच होईल. संपूर्ण महाराष्ट्रालाही ते एकत्र यावेत असे वाटते, अशी भावना अनेक नेत्यांनी व्यक्त केलेली आहे.
त्यांना सोबत घेऊन लढू ! आदित्य ठाकरेंची राज ठाकरेंना एकत्र येण्यासाठी साद
आदित्य ठाकरे यांनीही मनसेला सोबत येण्याची साद घातली आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही कोणत्याही पक्षाबरोबर एकत्र येण्यास तयार आहोत. म्हणूनच आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला साद दिली असल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले.
आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिला आहे. आमची भावना व्यक्त केली आहे. मराठी माणूस व महाराष्ट्राच्या हितासाठी जो कोणी आमच्या बरोबर यायला तयार असेल आम्ही त्यांना बरोबर घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू. काल परवा आमचे नेते दीपेश म्हात्रे व मनसेचे नेते राजू पाटील यांनी एकत्र येऊन आंदोलन केले. हे त्याचंच उदाहरण आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
लोकांच्या मनात काय आहे हे आम्हाला माहिती आहे आणि आमचे मन देखील साफ आहे. जो कोणी नेता महाराष्ट्र हितासाठी आमच्याबरोबर यायला तयार असेल, जो पक्ष पुढे येत असेल, आम्ही त्यांच्याबरोबर एकत्र येऊन लढू, असेही ते म्हणाले होते.





