Pune News : ५१ हजार दिव्यांनी उजळली सारसबाग! त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त महालक्ष्मी मंदिरात दीपोत्सवाचा नेत्रदीपक सोहळा

प्रभात वृत्तसेवा
पुणे – सारसबागेजवळील श्री महालक्ष्मी मंदिरात बुधवारी आकर्षक रंगांतील पणत्यांसह हजारो दिव्यांची आरास, विविध रंगातील फुलांची सजावट आणि पुष्परंगावलीतून सूर्यनमस्कारांचे रेखाटन करण्यात आले. त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त मंदिरात ५१ हजार दीप प्रज्वलित करण्यात आले.श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागतर्फे हा सोहळा आयोजित केला होता. या वेळी ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अॅड. प्रताप परदेशी, भरत अग्रवाल, डॉ. तृप्ती अग्रवाल यांसह विश्वस्त उपस्थित होते.
विश्वकर्मा विद्यालय आणि विश्वकर्मा युनिर्व्हसिटीतील शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनींनी संयोजनात सहभाग घेतला.सूर्यनमस्कार हा सर्वांगीण व्यायाम आहे. त्यामुळे आपल्या आरोग्यासह स्मरणशक्तीचाही विकास होतो. त्यामुळे पुष्परंगावलीतून सूर्यनमस्कार साकारण्यात आले. विविधरंगी दीप प्रज्वलित करून मंदिराप्रमाणे समाजातील अज्ञानरुपी आणि विकाररुपी अंध:कार दूर व्हावा, अशी प्रार्थना देखील मातेचरणी केल्याचे अमिता अग्रवाल म्हणाल्या.





