Pune News : पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत पुण्यात खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन

प्रभात वृत्तसेवा
पुणे – शहरात अनेक गुणवान खेळाडू असून, खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून सर्व खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्यासाठी व्यासपीठ मिळणार आहे. त्यातून पुण्यातील क्रीडा संस्कृतीला बळकटी मिळणार असून, या स्पर्धेतून काही खेळाडू देशाचे नेतृत्व करू शकतात, असे मत खेलरत्न पुरस्कारप्राप्त ऑलिंपियन नेमबाज अंजली भागवत यांनी व्यक्त केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फिट युवा फॉर विकसित भारत, या आवाहनाला प्रतिसाद देत केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारातून पहिल्या खासदार क्रीडा महोत्सवाची सुरुवात मॅरेथॉनने झाली. स. प. महाविद्यालयाच्या मैदानात रविवारी (दि. २) खासदार क्रीडा महोत्सवासाठीची ज्योत प्रज्वलित करण्यात आली. या वेळी ऑलिंपियन, आशियाई पदक विजेते आणि सर्वच खेळांतील माजी खेळाडू, प्रशिक्षकांना आमंत्रित केले होते.
व्यासपीठावर श्रीरंग इनामदार, रमेश विपट, सुरेखा द्रविड, गौरव नाटेकर, संदीप कीर्तने, केदार जाधव, रेखा भिडे, मनोज पिंगळे, शांताराम जाधव, मनोर एरंडे, शकुंतला खटावकर, आकांक्षा हगवणे, कौस्तुभ राडकर यांसह आजी- माजी खेळाडू उपस्थित होते. खासदार मोहोळ यांनी आकाशात फुगे सोडून स्पर्धेची सुरुवात केली.मोहोळ म्हणाले, तरुण तंदुरुस्त राहिला, तर देश तंदुरुस्त राहील. त्यासाठीच या स्पर्धेचे आयोजन केले आहे. माझ्या पुण्याने देशाला अनेक खेळाडू दिले आहेत.
यानिमित्ताने पुण्यातील क्रीडा संस्कृतीचा प्रचार-प्रसार करायचा आहे. दरम्यान, खासदार क्रीडा महोत्सव १६ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. शहरातील विविध मैदानांवर एकूण ३५ प्रकारांच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे. या महोत्सवात खेळाडूंसोबतच ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि सर्वसामान्य नागरिकांनाही कौशल्य सादर करण्याची संधी मिळणार आहे.
देशात आरोग्य क्रांती – मोहोळ..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०४७ मध्ये विकसित भारतची वाटचाल करीत आहे. त्यासाठीच मोदीजींनी फिट इंडिया, स्लिम इंडिया अशा मोहिमा यशस्वीपणे राबवल्या. त्याला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. आंतरराष्ट्रीय योग दिन, खेलो इंडिया यांसह अद्ययावत वैद्यकीय सुविधा तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवल्यामुळे भारतात आरोग्य क्रांती झाली आहे, असे मत मोहोळ यांनी व्यक्त केले.





