Pune News : जिल्ह्यातील मतदार याद्यांवर हरकतींचा पाऊस! ५८ हजारांहून अधिक हरकती ; प्रशासन थेट मतदारांच्या दारी

प्रभात वृत्तसेवा
पुणे – जिल्ह्यातील १४ नगर परिषदा आणि ३ नगर पंचायतींच्या निवडणुकीसाठी प्रभाग निहाय मतदान केंद्र निश्चित करून मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिध्द केली होती. मतदान केंद्रनिहाय यादींवर एकूण ५८ हजार ६९७ हरकती दाखल झाल्या. यात मुख्यत्वे प्रभाग बदलल्याच्या हरकती असून याबाबत प्रत्यक्ष मतदाराच्या घरी भेट देऊन त्यावर निर्णय घेण्यात येत आहे. आतापर्यंत १४ हजार ४१८ हरकती निकाली काढण्यात आल्या आहेत.
नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीसाठी प्रशासनाने ८ ऑक्टोबर रोजी प्रारुप प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली होती. त्यावर हरकती देण्यासाठी १३ ऑक्टोबरची मुदत होती. मात्र, त्याला चार दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. त्यानुसार शुक्रवारी (दि. १७) ही मुदत संपली. सर्वाधिक १८ हजार २३४ हरकती एकट्या फुरसुंगी उरुळी देवाची हद्दीतून आल्या. या हरकतींमध्ये ९५ टक्के हरकती एका प्रभागातील मतदाराचे नाव दुसऱ्याच प्रभागात आल्याबाबत आहेत.
त्यामुळे या हरकतींचे निराकरण करण्यासाठी मतदाराच्या घराची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येत आहे. त्यासाठी प्रत्येक नगरपरिषद व नगरपंचायतीमार्फत पर्यवेक्षक, लिपिक व बीएलओ यांचे पथक नेमून प्रत्यक्ष पाहणी करून हरकती निकाली काढण्याची कार्यवाही सुरू आहे. यासाठी संबंधित कार्यक्षेत्रातील उपविभागीय अधिकाऱ्यांना प्राधिकृत केल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील नगरविकास विभागाचे उपायुक्त व्यंकटेश दुर्वास यांनी दिली.





