Pune News | पुणे विद्यापीठाचं संकेतस्थळ हॅक? ; थाई भाषेतील जुगाराच्या जाहिरातींचा गोंधळ

प्रभात वृत्तसेवा
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संकेतस्थळ उघडले असता, त्यावर थाई भाषेतील मजकूर दिसत असल्याने हे संकेतस्थळ हॅक झाल्याची शंका विद्यार्थ्यांनी उपस्थित केली आहे. असा प्रकार याआधीही झाला असल्याने विद्यापीठाकडे असलेली विद्यार्थ्यांची खासगी आणि गोपनीय माहिती कितपत सुरक्षित आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. विद्यापीठाने याबाबत जाहीर प्रकटन द्यावे, अशी मागणी विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीचे राहुल ससाणे यांनी केली आहेत.
गुगलवर विद्यापीठाबद्दल माहिती शोधण्याचा प्रयत्न केला असता, विद्यापीठाच्या संकेतस्थळाखाली थाई भाषेतील जुगाराच्या खेळांची जाहिरात दिसते. ज्या ठिकाणी विद्यापीठाच्या माहिती हवी, त्या ठिकाणी थाई भाषेतील मजकूर निदर्शनास येत असून त्यामध्ये पीजीएसएलओटी स्लॉट, जिली आणि पीपीसारख्या खेळांचे प्रात्याक्षिके असलेला १०० खरा गेम खेळण्याची आनंद घ्या. हा ऑनलाइन खेळ २०२५ मध्ये उपलब्ध असलेला सर्वोत्तम कसिनो खेळ असून १०० टक्के सुरक्षित आहे.
पुणे विद्यापीठात दरवर्षी हजारो विद्यार्थी दरवर्षी प्रवेश घेत असतात. प्रवेशा वेळी, परीक्षेच्या कालावधीत, प्रमाणपत्र मिळवताना आणि इतर अनेक कारणांसाठी विद्यार्थ्यांना या संकेतस्थळावर त्यांचे आधारकार्ड, इमेल, मोबाइल नंबर आदींची माहिती संकेतस्थळात भरावी लागते. त्यामुळे या संकेतस्थळावर उपलब्ध माहिती अतिशय संवेदनशील आहे. अशात जर हे संकेतस्थळ हॅक होत असेल, तर या माहितीचा गैरवापर केला जाऊ शकतो. त्यामुळे विद्यापीठाने याबाबत आधी जाहीर प्रकटन द्यावे. शिवाय संकेतस्थळाची सुरक्षितता अधिक मजबूत करावी, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.





