वाघोली : पुणे जिल्हा भाजपच्या पुणे उत्तर मावळ जिल्हाध्यक्षपदी प्रदीप विद्याधर कंद यांची निवड झाली त्यांच्या निवडीबद्दल जिल्ह्यातून कंद यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश निवडणूक निर्णय अधिकारी आमदार चैनसुख संचेती यांनी कोकण ,पश्चिम महाराष्ट्र ,उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, मुंबई यांसह जवळपास 58 जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या असून यात पुणे जिल्ह्यात उत्तर विभागाचे जिल्हाध्यक्ष म्हणून प्रदीप कंद यांची निवड झाल्याने कंद यांचे कौतुक केले जात आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोशल मीडियावर कंद यांच्या सोबत 58 नवनियुक्त जिल्हाध्यक्षांचे अभिनंदन केले आहे. कंद यांच्या निवडीबद्दलचा राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पुणे जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष, नंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असा बहुमान एकाच वेळेस मिळवणारे कंद हे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारे नेते म्हणून सर्वश्रुत आहेत. हवेली तालुक्यात कंद यांच्या निवडीमुळे शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातील भाजपची ताकद मजबूत झाली आहे. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या 34 गावांचा प्रश्न सोडवण्यासाठी व इतर तालुक्यांमधील विविध प्रश्न सोडवण्यासाठी कंद यांच्यासारखा अभ्यासू नेता राजकीय, सामाजिक पटलावर महत्त्वाची बाजू सांभाळणार असल्याने तालुक्याच्या दृष्टीने अभिमानाची बाब घडली असल्याची भावना पुणे जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांनी व्यक्त केली आहे.