Pune News : महापालिकेचा मेगा प्लॅन! आरटीओ चौकातील वाहतुकीचा तिढा सुटणार..हा आहे उपाय

प्रभात वृत्तसेवा
पुणे : आरटीओ चौक आणि मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौक यांना जोडणारा अरुंद रेल्वे भुयारी मार्ग रुंद करण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे. या मार्गाच्या दोन्ही बाजूला असलेले रस्ते मोठे आहेत. त्यातच, या रस्त्यांवरून येणाऱ्या वाहनांची संख्या अधिक असल्याने अनेकदा या भुयारी मार्गाच्या परिसरात वाहतूक कोंडी होते. ही कोंडी फोडण्यासाठी या मार्गाचे रूंदीकरण केले जाणार असून, या कामासाठी सल्लागार नियुक्त करण्याची प्रक्रिया महापालिकेकडून सुरू करण्यात आली आहे.
पालिकेच्या प्रकल्प विभागाकडून ही कामे केली जाणार आहेत.पुणे रेल्वे स्टेशन, ससून रुग्णालय, मालधक्का, जिल्हाधिकारी कार्यालय आणि आरटीओ ही महत्त्वाची केंद्रे या परिसरात असल्याने या मार्गावर कायम वाहतूक कोंडी होते. सध्या असलेला भुयारी मार्ग शंभर वर्षांपूर्वी बांधलेला असून, त्याची रुंदी अवघी पाच मीटर आहे. त्यामुळे मोठ्या वाहनांची वाहतूक होऊ शकत नाही आणि प्रवाशांना स्टेशन गाठताना अडचणींचा सामना करावा लागतो.
महापालिकेने रेल्वे प्रशासनाला पत्र पाठवून नव्या भुयारी मार्गासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. रेल्वेने परवानगी दिल्यास ९ ते १० मीटर रुंदीचा नवा मार्ग तयार करून विद्यमान मार्गाचेही रुंदीकरण केले जाणार आहे. अशा प्रकारे दोन्ही बाजू एकत्र करून एकूण २० मीटर रुंदीचा बोगदा तयार करण्याचा महापालिकेचा मानस आहे.
प्रकल्प विभागाने या कामासाठी सल्लागार नेमण्याची निविदा जाहीर केली असून, ठेकेदार निश्चित झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत आराखडा सादर केला जाणार आहे. या आराखड्यात भुयारी मार्गाची रचना, अंदाजित खर्च आणि आवश्यक जागेचा तपशील समाविष्ट असेल. प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार भुयारी मार्गाचे रुंदीकरण झाल्यास आरटीओ चौक आणि शाहीर अमर शेख चौकातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि या परिसरातील वाहतुकीचा प्रवाह सुलभ होईल.



