Pune News : कात्रज चौकात मराठा समाजाचा ‘रस्ता रोको’; मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा
आंदोलनादरम्यान शेकडो कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठाण मांडून "एक मराठा, लाख मराठा" अशा जोरदार घोषणा दिल्या. यामध्ये महिलांचा देखील सहभाग होता.

Pune News – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे उपोषणाला बसलेले संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ पुण्यात मराठा समाज आक्रमक झाला आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवारी दुपारी ४ वाजता कात्रज चौकात जोरदार ‘रस्ता रोको’ आंदोलन करण्यात आले.
आंदोलनादरम्यान शेकडो कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठाण मांडून “एक मराठा, लाख मराठा” अशा जोरदार घोषणा दिल्या. यामध्ये महिलांचा देखील सहभाग होता. यामुळे पुणे-सातारा महामार्ग आणि शहरातील प्रमुख जोड रस्त्यांवर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
मनोज जरांगे यांची खालावणारी प्रकृती पाहाता राज्य सरकारने कोणताही विलंब न करता मराठा समाजाच्या मागण्या तत्काळ मान्य कराव्यात, अशी मागणी आंदोलकांनी केली. मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ मोठा बंदोबस्त तैनात केला.
पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सह-पोलीस आयुक्त राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झीने व सुदर्शन गायकवाड यांनी आंदोलकांशी सकारात्मक संवाद साधून त्यांची समजूत काढली आणि वाहतूक पूर्ववत केली. या आंदोलनात संतोष भोगडे, अॅड. शुभम फडतरे, सुधीर मते, आप्पा देशमुख, समीर पायघुडे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.





