Pune News | ‘लेट लतीफ’ कर्मचाऱ्यांना इमारतीबाहेर थांबण्याची शिक्षा

प्रभात वृत्तसेवा
पुणे – महापालिकेतील लेटलतिफ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर सर्जिकल स्ट्राईक करताना आयुक्तांनी वेळाने आलेल्यांना पालिकेच्या इमारतीबाहेरच थांबण्याची शिक्षा सुनावली. कर्मचारी वेळेवर येतात की नाही याची तपासणी केली असता तब्बल ५५० कर्मचारी उशिरा आल्याचे उघड झाले.
एवढा मोठा आकडा पाहून आयुक्त नवल किशोर राम यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या कर्मचाऱ्यांची नावे संबंधित विभागप्रमुख, खातेप्रमुखांना कळविण्यात येणार असून त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई केली जाणार आहे. आयुक्तांच्या आदेशानुसार सुरक्षा विभागाने ही कारवाई केली असून अतिरिक्त आयुक्त एम. जे. प्रदीप चंद्रन यांनीही पाहणी केली.
पालिका अधिकारी, कर्मचार्यांनी वेळेवर कामावर यावेत, यासाठी आयुक्तांनी आदेश काढले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून अनेकजण ‘आओ जाओ घर तुम्हाला’ अशा थाटात कार्यालयात येत असल्याच्या तक्रारी आयुक्तांकडे आल्या होत्या. त्याची दखल घेत शुक्रवारी कारवाई केली.
पालिकेत पाच दिवसांचा आठवडा असून त्यानुसार सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ अशी कार्यालयाची वेळ आहे. दुपारी २ ते अडीच जेवणासाठी सुटी आहे. कार्यालयीन कामासाठी बाहेर जायचे असल्यास रजिस्टरवर नोंद करून बाहेर जाता येते. गेल्या तीन वर्षांपासून पालिकेत प्रशासकीय कार्यभार असल्याने आणि नगरसेवकांचा वचक नसल्याने कर्मचारी मनमानीपणाने वागत असल्याचे आढळले होते.
जेवणाला तास; दोन वेळा चहा..
अनेकजण तासभर उशीरा आल्यानंतर लगेच ११.३० ला चहासाठी बाहेर पडतात. बारा वाजता आल्यावर अवघे दीड तास काम झाले की जेवणाच्या सुट्टीचे वेध लागतात. दोनला जेवणाची वेळ असून दीडपासून कार्यालयाची दारे बंद केली जातात. अडीचला वेळ संपत असली तरी प्रत्यक्षात तीन वाजेपर्यंत जेवण चालते. यानंतर अनेक महिला कर्मचारी शतपावलीसाठी इमारतीत फिरत राहतात.
त्यानंतर तासभर काम झाले की, साडेचार ते पाचला कर्मचारी बाहेर पडतात ते साडेपाचला येतात. त्यानंतर री झाण्याचे वेध लागते. सव्वा सहा वाजता कार्यालय सोडणे अपेक्षित असताना सहापासूनच आवराआवरी करून तयार असतात. त्यामुळे अनेकजण दिवसात दोन ते अडीच तासच जागेवर असतात. त्यामुळे नागरिकांना ताटकळत बसावे लागते.




