Pune News | अपहरणाचा आरोप खोटा ; सावंत यांचा मुलगा स्वतःहून बँकॉकला निघाला होता

प्रभात वृत्तसेवा
पुणे – माजी राज्य आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत (२९) याचे अपहरण झाले नसल्याचा अहवाल पुणे पोलिसांनी बुधवारी न्यायालयात सादर केला. त्याच्याबाबतचा अपहरणाचा आरोप सिद्ध होत नसल्याने पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट सादर केला.याबाबत परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम म्हणाले, आरोपी म्हणून नाव असलेले दोघेजण हे प्रत्यक्षात ऋषिराजचे मित्र असल्याचे तपासात समोर आले. त्यांनी मिळून बँकॉकला जाण्याचे ठरविल्याने हा अपहरणाचा गुन्हा ठरत नाही.
याबाबत १० फेब्रुवारी रोजी तानाजी सावंत यांच्या चालकाने सिंहगड रोड पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले होते की, नर्हेतील सावंत यांच्या शैक्षणिक कॅम्पसमधून दुपारी दोन व्यक्तींनी कारमधून ऋषिराजचे अपहरण केले. तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संबंधित कार थेट विमानतळाकडे गेल्याचे दिसून आले. तेथे ऋषिराज आणि त्याचे मित्र खासगी चार्टर्ड विमानाने बँकॉककडे रवाना झाले होते. ही माहिती मिळताच पोलिसांनी नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाशी संपर्क साधला.
त्यानंतर विमान चालकाला संदेश पाठवला आणि विमान अंदमान-निकोबार बेटांच्या अवकाशातून परत पुण्यात आणण्यात आले. घटनेनंतर रात्री तानाजी सावंत यांनी स्पष्ट केले होते की, त्यांचा मुलगा आणि त्याच्या मित्रांनी व्यवसायिक कामानिमित्त हा प्रवास आखला होता. मात्र, त्यांनी याची माहिती दिली नव्हती. चार्टर्ड विमानासाठी केलेला पैशाचा भरणा सावंत यांच्या शैक्षणिक संस्थेच्या बँक खात्यातून केल्याचे तपासात आढळले होते.
पोलिसांचे मौन..
कोंढवा येथे एका तरुणीने बलात्काराची खोटी फिर्याद दिल्यावर पोलिसांनी तपासानंतर तिच्यावर गुन्हा दाखल केला होता. अपहरण प्रकरणात पोलीस ही तत्परता दाखवणार का ?, या प्रश्नावर मात्र पोलिसांनी मौान पाळले आहे.





