Pune News : भांडत बसण्यापेक्षा दोघांनी अवलंबिला वेगळा मार्ग; समुपदेशनांतर दोघे झाले विभक्त

पुणे – वैचारिक मतभेदामुळे पती-पत्नीमध्ये ३ वर्षांपासून सुरू असलेला वाद समुपदेशानंतर मिटला आहे. समुपदेशनात दोघे एकत्र येणे शक्य नसल्याने निष्पन्न झाले. त्यानंतर दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.
यामुळे होणाऱ्या मानसिक त्रासातून दोघांची मुक्तता झाली आहे. स्वतंत्र्यपणे आयुष्य जगण्यास दोघेही मोकळे आहेत. निकालानुसार ६ वर्षाच्या मुलीचा ताबा पत्नीकडे राहणार आहे. पतीला मुलीवर भेटण्याचा अथवा कोणताही अधिकार देण्यात आलेला नाही.
माधव (वय ३५) आणि माधवी (वय ३०) (नावे बदलली आहेत) दोघांचा विवाह १० वर्षांपूर्वी झाला आहे. तो खासगी क्षेत्रात नोकरी करतो. तर ती गृहिणी आहे. सुरूवातीला संसार सुरळीत सुरू होता. दोघांना मुलगीही झाली.
मात्र, त्यानंतर काही दिवसांनी वैचारिक मतभेद सुरू झाले. हे मतभेद इतके विकोपाला गेले की, पतीने न्यायालयाची पायरी चढत घटस्फोटासाठी दावा दाखल केला. त्यानंतर ती या दाव्यात हजर झाली.
त्यानंतर हे प्रकरण समुपदेशनासाठी समुपदेशक अॅड. राणी कांबळे-सोनावणे यांच्याकडे गेले. मात्र, तेथे दोघात तडजोड झाली नाही. त्यामुळे दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. मात्र, दोघात एक फ्लॅट होता. तो दोघांच्या नावावर होता. त्यावेळी हा फ्लॅट विकण्याचा निर्णय घेतला.
त्यामधील ६० टक्के रक्कम माधव, तर उर्वरित ४० टक्के रक्कम माधवीला देण्यात आली. २ ते ३ तोळे असलेले स्त्रीधन माधवीला मिळणार आहे. मुलीचा पूर्णपणे ताबा तिच्याकडेच राहणार आहे.
पतीला भेटण्याचाही अधिकार देण्यात आलेला नाही. तर या बदल्यात तिने पोटगीचा अधिकार पूर्णपणे सोडला आहे. यानंतर दोघे एकामेकाविरोधात कसलीही कायदेशीर कारवाई करणार नसल्याचेही ठरले आहे.
मागील ३ वर्षात दांपत्यात भांडण सुरू आहे. याचा परिणाम दोघांच्या कुटुंबार होत आहे. भविष्यातही दोघे एकत्र येण्याची शक्यता नाही. भांडत बसण्यापेक्षा दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दोघेही स्वतंत्र्यपणे आयुष्य जगण्यास मोकळे आहे. यातून वेळ, पैसा आणि मानसिक त्रासातून दोघांची मुक्तता झाली आहे.
– अॅड. राणी कांबळे-सोनावणे -समुपदेशक, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकर





