Pune News : पुणे आणि उपनगरांत मुसळधार पावसाचा कहर; जनजीवन विस्कळीत

Pune News : पुणे शहर आणि उपनगरांमध्ये सोमवारी सायंकाळपासून झालेल्या जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले असून वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.
येरवडा, कोरेगाव पार्क, धानोरी, टिंगरेनगर, एरंडवणा, देवाची ऊरुळी, बावधन, मुकुंदनगर, काळेपटल, काळेबोराटे नगर, हडपसर आणि फातिमानगर या भागांमध्ये झाडे कोसळल्याच्या १५ घटना अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात नोंदवण्यात आल्या आहेत. सुदैवाने या घटनांमध्ये कुणीही जखमी झालेले नाही.
धनकवडीतील तीन हत्ती चौक आणि इतर काही भागांत संरक्षक भिंती कोसळल्या आहेत. काही परिसरांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला असून नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
शिवाजीनगर, सदाशिव पेठ, सहकार नगर, धनकवडी, कात्रज, कोंढवा, खडकवासला, नांदेड सिटी, शिवणे, हडपसर, वाघोली आणि वडगाव शेरी या भागांत विशेषतः अधिक पावसाची नोंद झाली आहे.
अचानक आलेल्या पावसामुळे काही घरांमध्ये पाणी शिरले असून नागरिकांनी सुरक्षित राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क असून मदत कार्य सुरू आहे.




